महापालिका क्षेत्रातील कोरोना मृतांचे होणार ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:27+5:302021-03-21T04:25:27+5:30
सांगलीत जिल्हा परिषदेत वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अध्यक्षतेखाली कोविड मृत्यू अन्वेषण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
सांगलीत जिल्हा परिषदेत वसंतदादा पाटील सभागृहात जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अध्यक्षतेखाली कोविड मृत्यू अन्वेषण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोविडने मृत झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व संबंधित कोविड हॉस्पिटलचे नोडल अधिकारी यांनी या बैठकीत उपस्थित राहून समितीसमोर संबंधित कागदपत्रांसह माहिती व सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गतवर्षी मार्चपासून कोविडमुळे जिल्ह्यात दीड हजार व महापालिका क्षेत्रात ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णांवर केलेल्या उपचारांची चाैकशी समितीमार्फत करण्यात येते. यापूर्वीही दोन वेळा कोविड मृत्यू अन्वेषण समितीची बैठक झाली आहे. आता जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढत असल्याने बंद असलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील सर्व कोविड मृत्यू प्रकरणांचा अहवाल केसपेपरसह सादरीकरण करण्याच्या व रुग्णाच्या मृत्यूच्या निष्कर्षाची प्रत विहीत नमुन्यात बैठकीत सादर करण्याच्या सूचना मिरजेतील कोविड सेंटरना देण्यात आल्या आहेत.
बैठकीस उपस्थित न राहिल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिला आहे. महापालिका वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांमार्फतही कोविड उपचार करणाऱ्या संचालक, सेवासदन हॉस्पिटल, मिरज, संचालक वॉन्लेस हॉस्पिटल, मिरज अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.