शहरातील रस्ते कामावरून उपमहापौर-प्रशासनात वाद पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:10 PM2020-01-13T13:10:14+5:302020-01-13T13:12:33+5:30
सांगली शहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून उपमहापौर धीरज सूर्यवंशी व प्रशासनात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
सांगली : शहरातील ६४ लाख रुपयांच्या रस्ते कामावरून उपमहापौर धीरज सूर्यवंशी व प्रशासनात वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
या कामाला मंजुरीचा विषय महासभेसमोर आणला आहे. येत्या दि. २० रोजी होणाऱ्या सभेत त्यावर शिक्कामोर्तब होईल. पण स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही प्रशासनाने या कामाची फाईल अडविली असून, इतर कामांना हाच निकष का लावला गेला नाही, असा प्रश्न उपमहापौरांकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीकडेही तक्रार केली आहे. त्यामुळे महासभेत हा विषय चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.
उपमहापौर सूर्यवंशी यांच्या प्रभागातील महावीरनगर जैन मंदिर ते कोठारी घर ते जुनी वसंतदादा बँक इमारत, जगवल्लभ पतसंस्था ते साई कॉम्प्लेक्स, जैन बोर्डिंग ते प्रताप टॉकीज या रस्त्याच्या डांबरीकरणाचे ६४ लाखाचे काम होते. या कामासाठी ०.९१ टक्के कमी दराने निविदाही दाखल झाली.
या निविदेला स्थायी समिती सभेनेही मंजुरी दिली. स्थायीच्या दरमान्यतेनंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा होती. प्रशासकीय स्तरावर या कामाची फाईल अडविली गेली. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी फाईल गेल्यानंतर त्यांनी, ५० लाखावरील निर्णयाचे अधिकार महासभेला असल्याचा शेरा मारला. हा विषय मंजुरीसाठी महासभेकडे पाठविण्याची शिफारसही केली.
उपमहापौरांनी या विषयाचे विषयपत्र तयार करून ते महासभेकडे दिले. येत्या २० जानेवारी रोजीच्या सभेचा अजेंडा गुरुवारी प्रसिद्ध झाला. यात सूर्यवंशी यांच्या कामाला मान्यता देण्याचा विषय सभेच्या पटलावर घेतला आहे. हा विषय मंजूरही होईल. पण उपमहापौरांच्या कामाला प्रशासनाने लावलेला निकष इतर कामांबाबत का पाळला गेला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी ५० लाखांच्यावरील अनेक विषय स्थायी समितीसमोर आणले. नगरोत्थान योजनेंतर्गत १०० कोटी रुपयांच्या कामांमधील अनेक कामे ५० लाखावरील आहेत. तरीही स्थायी समितीची मंजुरी घेऊन ही कामे सुरू करण्यात आली. मिरजेत १३ कोटी रुपये खर्चून भाजी मंडई उभारण्यात येणार आहे.
सांगलीतील भाजी मंडई नूतनीकरणासह रस्ते काम व अन्य ५० लाखांच्या वरील कोट्यवधी रुपयांचे विषय आहेत. त्यावेळी हा निकष कुठे गेला, असा प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे. या रस्ते कामाच्या विषयावरून उपमहापौर व प्रशासनातील वादाला तोंड फुटले आहे. येत्या महासभेत हा विषय वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.