वारणालीच्या जागेवर महापालिकेचे रुग्णालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:20+5:302021-04-24T04:26:20+5:30
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १० आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी हॉस्पिटल मंजूर झाले होते. त्यातील १० ...
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १० आरोग्य केंद्रे आणि कुपवाडसाठी हॉस्पिटल मंजूर झाले होते. त्यातील १० आरोग्य केंद्रे सुरूही झाली आहेत. मात्र, जागेच्या वादात वारणालीत मंजूर झालेले ५० बेडचे हॉस्पिटल रखडले होते. महापालिकेच्या स्वत:च्या जागेवर हे हॉस्पिटल मंजूर असून त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केला आहे.
दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर कुपवाड गावठाणमध्येच हॉस्पिटल व्हावे, अशी महासभेत मागणी करण्यात आली. त्यानुसार, भाजपने वाघमोडेनगर येथे खासगी जागा विकत घेऊन तेथे हॉस्पिटल उभारणीचा ठराव महासभेत केला होता.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विष्णू माने यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे वारणालीतच हॉस्पिटल होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी वाघमोडेनगरमधील जागेचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला. शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने हॉस्पिटलच्या जागाबदलाचा ठराव निलंबित केला. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम हे शुक्रवारी आढावा बैठकीसाठी महापालिकेत आले होते. यावेळी या ठराव विखंडित करण्याबाबत चर्चा झाली. कदम यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शिंदे यांनी ठराव विखंडित करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता वाघमोडेनगरऐवजी वारणालीतील जागेवरच हे रुग्णालय होणार आहे.
चौकट
निविदाही प्रसिद्ध
आयुक्त कापडणीस यांनी हॉस्पिटलचा आराखडा तयार करून त्याच्या उभारणीची निविदा जाहीर केली होती. यामध्ये चार कोटी ४५ लाख ६१ हजार ५२३ रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. ऑनलाइन निविदा मागविल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी दिवाणी न्यायालयातही याचिका दाखल झाली असून निविदेला स्थगिती आहे.