जत तालुक्यात तिरंगी-चाैरंगी लढती रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:24 AM2020-12-24T04:24:05+5:302020-12-24T04:24:05+5:30

जत : जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्थानिक पॅनेलप्रमुखांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ...

There will be three-way fights in Jat taluka | जत तालुक्यात तिरंगी-चाैरंगी लढती रंगणार

जत तालुक्यात तिरंगी-चाैरंगी लढती रंगणार

Next

जत : जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्थानिक पॅनेलप्रमुखांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये पक्षीय पातळीवर, तर लहान ग्रामपंचायतींमध्ये आघाड्या करून निवडणूक लढवण्याची तयारी स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. बहुतांश गावात तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव व जातीचा दाखला मिळविण्यासाठी पॅनेलप्रमुख व इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच गडबड करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मार्गशीर्ष महिना असल्यामुळे बहुतांश घरांमध्ये मांसाहारी जेवण बनविले जात नाही. त्यामुळे शाकाहारी जेवणावरच कार्यकर्त्यांना समाधान मानावे लागत आहे. मार्गशीर्ष महिना हा ग्रामपंचायत निवडणुकीतील अडसर ठरणार असला, तरी इच्छुक उमेदवार व पॅनेलप्रमुखांच्या खर्चात यामुळे बचत होणार आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली व कोणत्या नेत्याचे सहकार्य घेऊन निवडणूक रिंगणात उतरून पॅनेल तयार करायचे, यासंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांनी आतापासून बैठका घेऊन चाचपणी करायला सुरुवात केली आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी व दाखल करण्यासाठी जत तहसीलदार कार्यालय परिसरात गर्दी केली आहे. शासकीय धान्य गोदाम, जत येथे उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पहिल्या फळीतील नेतेमंडळी अद्याप शांत आहेत. परंतु दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी सक्रिय आहेत. आगामी बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेते आतापासून सक्रिय झाले आहेत. अंकलगी, अंकले, भिवर्गी, धावडवाडी, डोर्ली, घोलेश्वर, गुड्डापूर, गुगवाड, जालिहाळ खुर्द, करेवाडी (तिकोंडी), कुडणूर, कुलाळवाडी, लमाणतांडा (उटगी), लमाणतांडा (दरीबडची), मेंढेगिरी, मोरबगी, निगडी बुद्रुक, सनमडी, शेड्याळ, शेगाव, सिद्धनाथ, सिंगनहळ्ळी, सोनलगी, तिकोंडी, टोणेवाडी, उमराणी, उंटवाडी, उटगी, वळसंग, येळदरी या तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

Web Title: There will be three-way fights in Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.