सांगलीत होणार दोन पर्यायी पूल - आयर्विन पुलाजवळची जागा निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:33 PM2019-02-04T23:33:27+5:302019-02-04T23:34:21+5:30
बहुप्रतीक्षित हरिपूर-कोथळी व आयर्विनच्या पर्यायी पुलाच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. दोन्ही पुलांसाठी ४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहे
सांगली : बहुप्रतीक्षित हरिपूर-कोथळी व आयर्विनच्या पर्यायी पुलाच्या कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केली आहे. दोन्ही पुलांसाठी ४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या दोन वर्षात दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील दळणवळण अधिकच सुलभ होणार आहे.
सांगली शहराला जोडणाऱ्या दोन नव्या पुलाच्या कामाबाबत विविध सामाजिक संघटनांनी वारंवार मागणी होत होती. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी शासनस्तरावर आयर्विनच्या पर्यायी पूल व हरिपूर-कोथळी पुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासनाने या दोन्ही पुलाच्या कामांना हिरवा कंदील दाखविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक मंजुरीनंतर अखेर या दोन्ही पुलांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. आयर्विन पुलासाठी १९ कोटी १६ लाख, तर हरिपूर-कोथळी पुलासाठी २३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कृष्णा नदीवरील आयर्विन पूल कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे, स्लॅब मोडकळीस आला आहे. पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहराचाच भाग असलेल्या सांगलीवाडीशी वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत. आयर्विन पुलाला पर्यायी बासपास रस्ता आहे. पण तो सांगलीवाडीबाहेरून असल्याने या गावाचा संबंध कमी झाला होता. त्यामुळे आयर्विनलगतच पर्यायी पुलाची मागणी होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचा आराखडा तयार करून त्याला तांत्रिक मान्यता घेतली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवित यंदाच्या अंदाजपत्रकात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षात या पुलाचे काम मार्गी लागणार आहे.
हरिपूरमधील श्री संगमेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी, जोतिबा आणि बाहुबली या तीर्थक्षेत्रांसाठी कृष्णा-वारणा नदीवर पुलाची मागणी होत होती. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील भाजीपाला, धान्याची आवक-जावक आणि विविध व्यवसायांना चालना देण्यासाठी पुलाची गरज होती. हा प्रश्नही वर्षानुवर्षे भिजत पडला होता.
अखेर या पुलाच्या कामालाही शासनाने मंजुरी दिली. नाबार्ड व राज्य शासनाच्या सहकार्यातून २३ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या या पुलाची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. हरिपूर येथील मातंग वस्तीजवळून हा पूल कोथळी बाजूच्या राज्यमार्गाला जोडला जाणार आहे. एकूण २१० मीटर लांबीचा हा पूल असेल.
आयर्विनला पर्यायी पूल तीनपदरी
आयर्विन पुलाजवळूनच १० मीटर अंतर सोडून पर्यायी पूल उभारला जाणार आहे. या नव्या पुलावर जाण्यासाठी टिळक चौक व पांजरपोळ या दोन्ही ठिकाणी वाय टाईप रस्ता ठेवला आहे. पुलाची उंची आयर्विनइतकीच असून, लांबी २00 मीटर आहे, तर पुलाच्या दोन्ही बाजूला २०० मीटरचा रस्ता असेल.
हा पूल तीनपदरी करण्यात आला आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एच. मुजावर यांनी सांगितले.
आयर्विन व हरिपूर-कोथळी पुलाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यातून सांगलीच्या विकासाचा मार्ग खुला होणार आहे. सांगली-कोल्हापूरची वाहतूकही जवळची होईल. या कामासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, अर्थमंत्र्यांनी सहकार्य केले.
- सुधीर गाडगीळ, आमदार, सांगली