डल्ला मारणारेच हल्लाबोल करताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:20 PM2018-04-01T23:20:35+5:302018-04-01T23:20:35+5:30
सांगली : महाराष्टÑात सत्ता उपभोगताना आजवर ज्यांनी डल्ला मारण्याचेच काम अधिक केले, तेच आता जनतेच्या प्रश्नावर हल्लाबोल आंदोलन करीत आहेत. जनतेला त्यांची कहाणी माहीत असल्याने त्यांना फारसा प्रतिसाद ते देणार नाहीत, अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, आमच्या सरकारने पारदर्शीपणाने कर्जमाफी दिली. मागील सरकारने अपात्र असलेल्या धनाढ्य लोकांना १५८ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. याची वसुली अजूनही सुरू आहे. अद्याप ५४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. आमचे सरकार थेट लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे काम करीत आहे. मागील सरकारमध्ये अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळेच जनता आमच्या पाठीशी ठाम आहे.
विरोधक एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. उलट आमच्यासाठी त्यांचे हे लक्षण चांगले मानतो. आयारामांवर भाजपची ताकद अवलंबून आहे, अशी टीका राष्टÑवादीचे नेते करतात. आम्ही प्रत्येकाला न्याय देत असतो. याउलट राष्टÑवादीवाले केवळ निवडून येणाऱ्या व त्यांच्या व्याख्येतील ताकदवान लोकांनाच जवळ करतात.
विरोधकांच्या आघाडीबाबत ते म्हणाले की, विरोधकांकडे आता तेवढाच एक मार्ग उरलेला आहे. भाजपच्या ताकदीपुढे ते टिकत नाहीत. जनता आपल्या पाठीशी आहे. जनता विरोधी पक्षांना टिकवूनही देत नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तरीही जनता त्यांना सत्ता देणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते.
मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी
चहापानासारख्या संस्कृतीला घोटाळ््यात समाविष्ट करून विरोधकांनी संस्कृतीला तिलांजली दिली आहे. त्यांचे हे राजकारण मला अत्यंत केविलवाणे वाटत आहे. कधी उंदीर घोटाळा, तर कधी चहा घोटाळा म्हणून ते भुई थोपटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी चहा आपल्या घरी नेला नाही की कुटुंबियांना पाजविला नाही. देशातील, राज्यातील तसेच परदेशातील लोक, शिष्टमंडळे त्यांच्याकडे येत असतात. अशावेळी संस्कृतीचा भाग म्हणून त्यांना चहा, नाष्टा दिला जातो. विरोधकांना आता या गोष्टीचे, या संस्कृतीचेही भान राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांकडे चहा घेणाºयांमध्ये विरोधी पक्षनेते व त्यांच्या पक्षाचे सदस्यही असतात. त्यामुळे घोटाळा म्हणून त्यांनी संस्कृतीचा अपमानच केला आहे.
जिल्हा बँकांनीही सवलत द्यावी!
एकरकमी परतफेड योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिने मुदतवाढ दिली आहे. दीड लाखापर्यंतची सवलत महाराष्टÑ राज्य शासन देत असताना जिल्हा बँका व अन्य बँकांनीही त्यांना थोडी वाढीव सवलत द्यावी, असे आवाहन यावेळी सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूरपेक्षा मी सांगलीत अधिक
म्हैसाळ योजनेच्या प्रश्नावर आंदोलन पेटले असताना पालकमंत्री सांगलीत आले नाहीत, अशी टीका देशमुख यांच्यावर झाली होती. त्याबाबत ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघापेक्षा मी सांगलीतच अधिक असतो. त्यामुळे सांगलीकडे मी दुर्लक्ष करीत असतो, ही टीकाच खोटी आहे.
मुंबईतील मेळाव्याची तयारी
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत ६ एप्रिल रोजी होत असलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने सांगलीत देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते मुंबईतील मेळाव्यात जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.