Sangli: ‘ॲलर्ट’ मेसेजमुळे बँकेतील चोरी रोखली, पोलिसांची चाहुल लागताच चोरटे पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:03 IST2024-11-28T12:03:11+5:302024-11-28T12:03:30+5:30

सांगली : मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेत मध्यरात्री तीन चोरटे घुसले. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा फिरवला. अलार्म सिस्टीमची वायर कापली. परंतु, ...

Thieves broke into Tasgaon Urban Bank in Market Yard in Sangli As soon as the police came, the thieves spread out | Sangli: ‘ॲलर्ट’ मेसेजमुळे बँकेतील चोरी रोखली, पोलिसांची चाहुल लागताच चोरटे पसार 

Sangli: ‘ॲलर्ट’ मेसेजमुळे बँकेतील चोरी रोखली, पोलिसांची चाहुल लागताच चोरटे पसार 

सांगली : मार्केट यार्डातील तासगाव अर्बन बँकेत मध्यरात्री तीन चोरटे घुसले. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा फिरवला. अलार्म सिस्टीमची वायर कापली. परंतु, त्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना गेला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण बघितले. चोरटे घुसल्याचे दिसले. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिसांची चाहुल लागताच चोरटे पसार झाले.

मार्केट यार्डात सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या इमारतीत दि तासगाव अर्बन बँकेची शाखा २०१७ पासून कार्यरत आहे. बँकेत आठ कर्मचारी काम करतात. मंगळवारी सायंकाळी नियमित वेळेत बँक बंद झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे बँकेजवळ आले. दोघांनी शटर उचकटले. त्यानंतर सुरक्षा अलार्म यंत्रणेची वायर कापली. ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याची दिशा बदलली. त्यानंतर चोरटे ‘स्ट्राँग रूम’कडे वळले. चोरट्यांना स्ट्राँग रूम फोडता आली नाही.

दरम्यान, चोरट्यांनी सुरक्षा अलार्म सिस्टीमची वायर कापल्यानंतर ‘अलर्ट मेसेज’ बँकेच्या अधिकाऱ्यांना गेला. त्यांनी तत्काळ ‘सीसीटीव्ही’ फुटेज मोबाइलवर पाहिले. तेव्हा चोरीचा प्रकार दिसून आला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ मार्केट यार्डात धाव घेतली. पोलिसांची चाहुल लागताच चोरट्यांनी पलायन केले. पोलिसांनी बँकेत जाऊन तपासणी केल्यानंतर एक कुकरी मिळून आली.

बुधवारी सकाळी बँकेतील अधिकारी, कर्मचारी आल्यानंतर तपासणी केली. चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बँकेचे व्यवस्थापक अश्विनकुमार बिरनाळे यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्यांच्या शोधासाठी पथक

बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजताच चोरट्यांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांची दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली.

चेहऱ्यावर स्कार्फ बांधला

तिघा चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ गुंडाळला होता. पहिल्या फुटेजमध्ये दोघेच चोरटे दिसून आले. त्यानंतर स्ट्राँग रूममध्ये चोरीसाठी आणखी एक चोरटा आल्याचे दिसून आले. चेहरे दिसू नयेत, याची तिघांनीही काळजी घेतली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलल्याचे दिसून आले.

श्वान घुटमळले

मध्यरात्री झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान पथकाने मार्केट यार्डातील उत्तर बाजूपासून मार्केट कमिटीपर्यंत माग काढला. त्याठिकाणीच ते घुटमळले.

चोरटे सराईत असल्याची शक्यता

चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून स्कार्फ बांधला होता. तसेच त्यांनी अलार्म सिस्टीमची वायरही कापून टाकली. त्यामुळे ते बिनधास्तपणे स्ट्राँगरूम फोडणार होते. परंतु, अलार्म सिस्टीमचा मेसेज अधिकाऱ्यांना गेल्यामुळे अनर्थ टळला. चोरटे सराईत असून, त्यांनी माहिती घेऊनच चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Web Title: Thieves broke into Tasgaon Urban Bank in Market Yard in Sangli As soon as the police came, the thieves spread out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.