चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी येणार तीन मोबाईलवर कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:14 AM2020-02-16T01:14:51+5:302020-02-16T01:17:27+5:30

शरद जाधव । सांगली : बंद घरे नेहमीच चोरट्यांचे लक्ष्य ठरतात. या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी ...

 Thieves can break into house calls on mobile! | चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी येणार तीन मोबाईलवर कॉल

चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी येणार तीन मोबाईलवर कॉल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस नाईक संदीप लांडगे यांचा शोध चोरट्यांनी घर फोडताच येणार मोबाईलवर कॉल! ‘कॅच इट’ उपकरणाची कमाल । । घरफोडीच्या घटनांना आळा बसणार

शरद जाधव ।
सांगली : बंद घरे नेहमीच चोरट्यांचे लक्ष्य ठरतात. या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी बंद घराचा दरवाचा फोडताच एकाचवेळी मोबाईलच्या तीन क्रमांकांवर कॉल करणारे उपकरण पोलीस कर्मचारी संदीप लांडगे यांनी तयार केले आहे. त्याचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सांगली पोलीस दलात फॉरेन्सिक विभागात कार्यरत असलेले संदीप अशोक लांडगे यांना नेहमी घरफोडीच्या ठिकाणी चोरट्यांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी जिल्हाभर जावे लागते. यातूनच त्यांना कल्पना सुचली, चोरीच होऊ नये यासाठी यंत्र तयार करण्याची! बी.एस्सी.सह डी.फार्मसीचे शिक्षण होऊनही त्यांना विद्युत-यांत्रिकी विभागामध्ये जादा रस होता. घरफोडीच्या ठिकाणी तपास करताना त्यांना घरमालकांची अगतिकता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी उपकरण तयार करण्याचा निर्धार करत काम सुरू केले. गेल्या आठ महिन्यांपासून ते यावर काम करत होते. अखेर त्यात त्यांना यश आले.

हे उपकरण पूर्णपणे दोन विभागात असून यातील एक भाग दरवाजाला जोडलेला असतो. घरात कोणी नसताना दार उघडल्यास अवघ्या तीस सेकंदात तीन मोबाईल क्रमांकांवर कॉल जातो. शेजाऱ्यांचा क्रमांक त्यात असल्यास ते तातडीने चोरट्याला पकडू शकतात. बॅटरीवर चालणारे हे उपकरण असून एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत ती चालू राहू शकते. त्याचे त्यांनी ‘कॅच इट’ असे नामकरण केले.

कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक बांधिलकीतून व आवड जोपासण्यासाठी त्यांनी ही निर्मिती केली आहे. या उपकरणाचे पेटंट मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनीही या उपकरणाचे प्रात्यक्षिक पाहून त्यांचे कौतुक केले आहे.


चोर पकडला गेल्यास सर्वाधिक आनंद
संदीप लांडगे म्हणतात की, यापूर्वी विविध प्रसंगी उपयोगाला येणारे आॅटोस्वीच मी स्वत: बनविले आहेत. आता ‘कॅच इट’ची मदत चोर पकडण्यासाठी होणार आहे. घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्यानेच ही कल्पना डोक्यात आली. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवू शकतात. मात्र, सर्वसामान्यांची अडचण ओळखून हे तयार केले. यामुळे चोर पकडला गेला, तर सर्वाधिक आनंद होणार आहे.


असे काम करते उपकरण
दोन विभागात असलेल्या या उपकरणातील एक भाग दरवाजाला लावता येणार आहे, तर दुसरे युनिट कोठेही ठेवता येऊ शकते. यात सीम कार्डची सोय असून, घरमालकाचे सीमकार्ड त्यात ठेवून इतर तीन क्रमांक ‘सेव्ह’ करता येतात. दरवाजा उघडताच त्या तीन क्रमांकांना थेट कॉल जाणार आहे. घरात कोणी नसताना ते फोडल्याची माहिती कॉलमुळे मिळणार असल्याने चोरटा पकडणे शक्य होणार आहे.


सामाजिक बांधिलकी
पोलीस तपासातील अडचणी दूर करण्यासाठी या उपकरणाची मदत होईल, असा विश्वास संदीप लांडगे यांना वाटतो. दहा उपकरणे तयार करून मोफत देण्याचा त्यांचा मनोदय आहे. सर्वसामान्यांना त्याचा फायदा व्हावा, चोरीच्या घटना रोखण्यासाठी मदत व्हावी, या हेतूने उपक रण बनवल्याचे ते सांगतात.

Web Title:  Thieves can break into house calls on mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.