विचारवंत म्हणाले, साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:21 PM2019-01-13T23:21:09+5:302019-01-13T23:21:30+5:30
सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा ...
सांगली : समाजातील दु:खी, पीडितांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांच्या दु:खात मनोरंजन शोधणाऱ्या प्रवृत्तींचा अखिल भारतीय साहित्य संमेलनात सहभाग असतो. नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटनापासून दूर ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाºयांचा केवळ निषेध न करता, कष्टकºयांच्या करातून जमा झालेला पैसा साहित्य संमेलनाला देऊ नये, अशी ठाम भूमिका मान्यवरांनी रविवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करून, नंतर निमंत्रण मागे घेण्याच्या निर्णयाच्या निषेधासाठी रविवारी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. यावेळी सहगल यांच्या संमेलनात होणाºया भाषणाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावून नंतर निमंत्रण रद्द करण्याच्या साहित्य संमेलन आयोजकांच्या निर्णयाने सर्वजण अस्वस्थ आहेत. कलावंत, लेखक, विचारवंतांचे वर्तन हे समाजासाठी प्रेरणा देणारे असावे. त्यांच्या साहित्यातून मानवतेची मूल्ये मांडली गेली पाहिजेत. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळे दृष्टी व्यापक करत विद्रोही साहित्याचे प्रमाण वाढले पाहिजे. खरा स्वातंत्र्यलढा उभारण्याची आता वेळ आली आहे. महामंडळाने शब्दवेल्हाळ गुलामांची फौज तयार केली आहे.
धनाजी गुरव म्हणाले, सहगल यांचे विचार पुरोगामी आहेत हे माहीत असतानाही, त्यांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलाविण्यात आले. समाजवादी व स्वत:ला क्रांतिकारी विचारांचे समजणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वळचणीला गेले आहेत. यातील अनेक लेखक स्वत:ला पुरोगामी म्हणवत असले तरी, त्यांच्या विचारातून ते दिसत नाही. या निर्णयाचा निषेध करायला हवा.
अॅड. के. डी. शिंदे म्हणाले, पुरस्कारांसाठी लिहिणाºया संमेलनाशी बांधील रहावे लागते. आता सावधपणे भूमिका आवश्यक आहे. सहगल यांचे निमंत्रण रद्दचे कृत्य हे अनवधानाने नव्हे, तर ठरवून झालेले कृत्य आहे. केवळ निषेध न करता साहित्य संमेलनासाठी देण्यात येणारे अनुदान बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा.
यावेळी नामदेव करगणे, वि. द. बर्वे, गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदूम, बी. जी. पाटील, योगेश पाटील, सदाशिव मगदूम, शाहिन शेख, विद्या स्वामी, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
बुधवारी सांगलीत पुस्तिकेचे प्रकाशन
जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनांच्या पुढाकाराने बुधवार, दि. २३ रोजी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. साहित्य संमेलनाचे अनुदान बंद करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण व इतर क्रांतिकारी विचारांची मांडणी असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्याचा निर्णय घेण्यात आला.