VidhanSabha Elections: 'तासगाव-कवठेमहांकाळ'च्या पटावर होणार तिसऱ्या आघाडीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:59 PM2024-09-06T16:59:25+5:302024-09-06T17:01:32+5:30

अजितराव घोरपडेंच्या भूमिकेची उत्सुकता

Third front entry with Rohit Patil and Prabhakar Patil for Tasgaon Kavathemahankal assembly elections | VidhanSabha Elections: 'तासगाव-कवठेमहांकाळ'च्या पटावर होणार तिसऱ्या आघाडीची एन्ट्री

VidhanSabha Elections: 'तासगाव-कवठेमहांकाळ'च्या पटावर होणार तिसऱ्या आघाडीची एन्ट्री

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळविधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील या युवा नेत्यांनी रणशिंग फुंकलेले आहे. आता माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची शेतकरी आघाडी आणि तासगाव तालुक्यातील तिसऱ्या आघाडीने एकत्रित येत, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेच्या पटावर एन्ट्री केली आहे. शुक्रवारी सावर्डे (ता. तासगाव) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात विधानसभेचे बिगुल फुंकले जाणार आहे. या मेळाव्यात माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेची उत्सुकता आहे. या वेळी खासदार विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याने हा मेळावा लक्षवेधी ठरणार आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीचा पट चांगलाच रंगला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील मैदानात उतरले आहेत. भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. यामुळे विधानसभेला दाेन युवा नेत्यांमध्येच दुरंगी सामना होईल, अशी चर्चा होती. मात्र, नव्या समीकरणांमुळे तिरंगी सामना होण्याचे संकेत आहेत.

सावर्डे येथे अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी विकास आघाडी आणि तासगाव तालुक्यातील तिसऱ्या आघाडीचा एकत्रित मेळावा आज होत आहे. दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येत अंजनी आणि चिंचणीला आव्हान देण्याची तयारी केली आहे. विधानसभेसाठी शेतकरी विकास आघाडीकडून घोरपडे यांचे पुत्र राजवर्धन घोरपडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील, भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष स्वप्निल पाटील इच्छुक आहेत. राजकीय पटावर परिस्थिती पाहून, या आघाडीचा एक उमेदवार रिंगणात उतरणार आहे. आजच्या मेळाव्यात याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट हाेईल.

विशाल पाटलांची उपस्थिती लक्षवेधी

सावर्डेतील मेळाव्यात खासदार विशाल पाटील यांचा सत्कार करण्याचे नियोजन आहे. विशाल पाटील यांच्या विजयासाठी घोरपडेंसह तिसऱ्या आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी जोरदार खिंड लढवली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांची उपस्थिती आणि भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.

तिसऱ्या आघाडीचे प्रमुख शिलेदार

जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. प्रताप पाटील, भाजपचे स्वप्निल पाटील, शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख प्रदीप माने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, वंजारवाडीचे सरपंच अरुण खरमाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील, निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील, विक्रांत पाटील.

Web Title: Third front entry with Rohit Patil and Prabhakar Patil for Tasgaon Kavathemahankal assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.