तिसरी आघाडी काँग्रेसबरोबर जाण्याचे संकेत
By admin | Published: July 16, 2015 11:19 PM2015-07-16T23:19:20+5:302015-07-16T23:19:20+5:30
सांगली बाजार समिती : शनिवारी पॅनेल होणार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा
सांगली : सांगली बाजार समिती निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या असतानाच, राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी तिसरी आघाडी काँग्रेसबरोबर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व जनता दलाचे नेते एकमेकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता बळावली आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, भाजप व मदन पाटील यांचा गट एकत्र आला आहे. त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती शनिवारपासून सुरू होत आहेत. काँग्रेसने यापूर्वीच जनसुराज्य पक्षाशी युती जाहीर केली आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीनुसार तिसरी आघाडीही ही निवडणूक लढविणार आहे. त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती सुरु करण्यात आल्या आहेत. शनिवारी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर पॅनेल जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी तिसऱ्या आघाडीने काँग्रेससोबत यावे, असे आवाहन केल्याने, तिसऱ्या आघाडीने यासंदर्भात विचार सुरु केला आहे. याबाबत तिसऱ्या आघाडीने चर्चा सुरु केली आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी युती
काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती शनिवारपासून सुरु होत आहेत. तिसरी आघाडी शनिवारी पॅनेल जाहीर करणार आहे. या दोन्ही पक्षात युती होणार असल्यामुळे तिसऱ्या आघाडीचे पॅनेल आता २० जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत.
राष्ट्रवादीने बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याने संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. यापुढे राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखणे याला आमचा प्राधान्यक्रम असणार आहे. काँग्रेसने युतीचा प्रस्ताव दिल्यास आम्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करू. आमचे पॅनेल येत्या शनिवार ंिकंवा रविवारी जाहीर करु. खा. राजू शेट्टी, माजी आ. शरद पाटील, माजी आमदार संभाजी पवार यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत.
- पृथ्वीराज पवार, शिवसेना नेते.