इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

By Admin | Published: May 6, 2016 12:23 AM2016-05-06T00:23:27+5:302016-05-06T01:18:20+5:30

सत्ताधाऱ्यांकडे गर्दी : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग रचनेवर प्रश्नचिन्ह

The third option discussed in Islampur | इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

इस्लामपुरात तिसऱ्या पर्यायाची चर्चा

googlenewsNext

अशोक पाटील --इस्लामपूर --नगरपालिका निवडणूक सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी आरक्षण सोडतीही काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे, तर विरोधी गटात कलह सुरू आहे. त्यासाठी तिसरा पर्याय असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.इस्लामपूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना काय असेल, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. गत निवडणुकीत तीन प्रभागांचा एक प्रभाग अशा पध्दतीने निवडणुका झाल्या होत्या. मात्र यावेळी लहान प्रभागनिहाय निवडणुका होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.सध्या पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी ताकदीने रणांगणात उतरणार आहे, तर विरोधकांत आजही एकमत नाही. राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांंंमध्ये विजय पाटील, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, संजय कोरे, सौ. अरुणादेवी पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, संजय कोरे यांचे प्रभाग अभेद्य आहेत, तर उर्वरित नगरसेवकांना उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तिप्रदर्शन करावे लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या इच्छुकांनी यावेळी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याची भाषा सुरु केली आहे.
उरुण परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, इस्लामपूर शहर विभागात मात्र विरोधकांची ताकद वाढल्याचे चित्र आहे. महाडिक युवा शक्तीच्या ताकदीवर ओसवाल गु्रप, सतीश महाडिक, चेतन शिंदे, जलाल मुल्ला यांच्यासारखे मातब्बर उमेदवार राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतात, तर व्यापारी वर्गातून एल. एन. शहाही यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. विजय कुंभार विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत असले तरी, त्यांना विरोधकांची एकत्रित ताकद मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांना नगण्य समजत आहेत. प्रभाग रचनेनंतर इस्लामपुरातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष लागले आहे.


प्रभाग रचनेविषयी अद्याप कोणतेही आदेश पालिकेकडे उपलब्ध नाहीत. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेविषयी आदेश येण्याची शक्यता आहे.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी


विरोधकांना घेऊनच सत्ताधाऱ्यांविरोधात शहरातील सुशिक्षित आणि चांगल्या वर्गातील उमेदवार एकत्रित करण्याचा विचार आहे. यात यश आले नाही, तर शहरात तिसरा पर्यायही असू शकेल.
- सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष,
स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Web Title: The third option discussed in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.