तृतीयपंथीय दिशानं लावला आंतरजातीय विवाह सोहळा..
By admin | Published: June 13, 2017 11:38 PM2017-06-13T23:38:42+5:302017-06-13T23:38:42+5:30
तृतीयपंथीय दिशानं लावला आंतरजातीय विवाह सोहळा..
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : काही व्यक्ती समाजमान्य चौकटीत बसत नाहीत म्हणून त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं जातं. समाजात वावरणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीही त्यापैकी एक. या व्यक्तींकडे समाज आजही वेगळ्या नजरेनं पाहतो. मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्या साताऱ्यातील एका नवदाम्पत्याने लग्नाची प्रतिज्ञा चक्क तृतीयपंथीयाकडून घेऊन या व्यक्ती समाजाचाच एक भाग असल्याचे दाखवून दिले आहे. इतकेच नव्हे तर आंतरजातीय विवाह करून या दाम्पत्याने जाती-पातीच्या भिंतीला तडा देऊन समाजात आदर्शही निर्माण केला आहे.
साताऱ्यात राहणारे धम्मरक्षित श्रीरंग रणदिवे (वय ३०) व स्वाती जयंत उथळे (२९) हे दोघेही मुक्तीवादी संघटेने कार्यवाहक असून उच्चशिक्षीत आहेत. गेल्या आठ वर्षांपासून ते या संघटनेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. समाजात आजही अनेक ठिकाणी जातीभेद पहावयास मिळतो. अशा परिस्थितीत जर कोणी आंतरजातीय विवाह करू पाहत असेल तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तीच या विवाहाचे समर्थन करतात. जाती-पातीची ही भींत तोडण्यासाठी आणि समाजात एक नवा आदर्श निर्माण करण्यासाठी धम्मरक्षित आणि स्वाती यांनी जात-पात न पाहता विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला अन् विवाहाला कुटुंबियांचे देखील समर्थन मिळाले.
कोणताही डामडौल न करता धम्मरक्षित व स्वाती यांनी साताऱ्यात ९ जून रोजी नोंदणी पद्धतीने विवाह केला. यानंतर ११ जून रोजी स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दिशा शेख यांनी दाम्पत्यास मिलिंद पवार यांनी लिहिलेली परिवर्तनाची प्रतिज्ञा दिली. डॉ. भारत पाटणकर, शाहीर संभाजी भगत, शीतल साठे, सचिन माने, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. प्रसन्न दाभोलकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते, अभिनेते यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावून नवदाम्पत्यास आशिर्वाद दिले.
कोण आहे दिशा शेख
‘शब्दवेडी दिशा’ अशी ओळख असलेल्या दिशा शेख या स्वत: तृतीयपंथीय असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपल्या स्वरचीत कवितांच्या माध्यमातून त्यांनी तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडले आहे. तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलावा यासाठी दिशा शेख प्रबोधनाचे काम करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी एनजीओच्या माध्यमातूनही समाजप्रबोधनाचे काम केले आहे.