तिसरी लाट दार ठोठावतेय... मुलांचे आजार अंगावर काढू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:35+5:302021-08-01T04:24:35+5:30
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवतो, असा इशारा तज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. ...
संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका संभवतो, असा इशारा तज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे लहानसहान आजारही अंगावर काढणे धोकादायक ठरू शकते, असा वैद्यकीय क्षेत्राचा सूर आहे.
पहिल्या लाटेत लहान मुले मोठ्या संख्येने बाधित झाली नाहीत, दुसऱ्या लाटेत मात्र ही संख्या लक्षणीय होती. १ एप्रिल रोजी दुसरी लाट सुरू झाली, त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजे ३१ मेपर्यंत १८ वर्षांपर्यंतची तब्बल ९ हजार मुले कोरोनाबाधित झाली होती. तिसऱ्या लाटेत ही संख्या आणखी वाढू शकते, असा कयास आहे. त्यामुळे मुलांचा लहानसहान आजार किंवा ताप अंगावर काढू नका, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
चौकट
पावसाळ्यात साथीचे आजार
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथींचे विविध आजार फैलावले आहेत. मुलांना सर्दी, खोकला, तापाने भंडावले आहे. बाल रुग्णालयांतील गर्दी वाढली आहे. कमी प्रतिकार क्षमतेची मुले कोरोनाबाधित होऊ शकतात.
चौकट
बालकांसाठी सिव्हिलमध्ये सज्जता
कोरोनाबाधित बालकांसाठी मिरज शासकीय रुग्णालयांत सज्जता ठेवण्यात आली आहे. मुलांसाठी १० व्हेन्टिलेटर खरेदीच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. कोरोनापश्चात आजारांवर उपचारांसाठी अैाषधे खरेदीची सूचनाही केली आहे. बेडची तयारीही केली आहे.
बॉक्स
प्रत्येक आजार म्हणजे कोरोनाच, असेही नाही...
- बालकाला येणारा प्रत्येक ताप किंवा सर्दी-खोकला म्हणजे कोरोनाच, असेही नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे न घाबरण्याचा सल्ला दिला आहे.
- अर्थात, मुलाला झालेला आजार म्हणजे पावसाळी ताप आहे की कोरोनाचा संसर्ग, याबाबतचा अंतिम निर्णय डॉक्टरांवरच सोपवायला हवा.
- अनेक मुलांना कफ प्रवृत्तीमुळे पावसाळ्यात तीव्र सर्दी व खोकला सतावतो. त्यांच्याबाबत कोरोनाच्या दृष्टीने अधिक सावधगिरी बाळगायला हवी.
लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता सध्या कमी झाल्याचे दिसत आहे. तरीही पालकांनी मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना आलेला ताप तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला तर त्वरित उपचार घेणे योग्य ठरते.
- डॉ. केतन गद्रे, बालरोग तज्ज्ञ, सांगली.
पॉईंटर्स
- कोरोनाचे रुग्ण - १,७४, १२८
- १८ वर्षांखालील रुग्ण - २२,०५०