क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने साडे तेरा लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा; सांगलीतील अनेकांना गंडा
By शीतल पाटील | Published: March 28, 2023 07:33 PM2023-03-28T19:33:03+5:302023-03-28T19:34:49+5:30
भीमगोंडा पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांनी कागदपत्रासह भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली : डॉक्सी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लोकांना दुप्पट लाभाचे आमिष दाखवून १३ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भीमगोंडा ऊर्फ सन्मती कुमगोंडा पाटील (रा. समडोळी, ता. मिरज) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित भीमगोंडा ऊर्फ सन्मती पाटील याने डॉक्सी क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलनामध्ये गुंतवणूक करून दहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्याने जिल्ह्यातील अनेकांकडून पैसे घेतले. त्याबदल्यात गुंतवणुकदारांना त्यांच्या मोबाईलवर डॉक्सी क्रिप्टोकरन्सीचे आयडी आणि डॉक्सी नावचे क्रिप्टोकरन्सी कॉईन दिले. पण त्याने गुंतवणुकदारांना दिलेल्या मुदतीनंतर परतावा दिला नाही. गुंतवणूकदारांनी तगादा लावताच त्याने टोलवा टोलवी केली.
गुंतवणूदारांना रक्कम परत न देता त्यांची १३लाख ६० हजार रुपयांना फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पाटील याच्याविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार अमोल लोहार, विनोद कदम, दीपाली पाटील यांनी ही कारवाई केली. भीमगोंडा पाटील याच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूदारांनी कागदपत्रासह भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.