वाहतुकीचा नियम मोडला, तब्बल तेरा कोटींचा दंड ठोठवला; सांगली वाहतूक पोलिसांची कारवाई
By संतोष भिसे | Published: December 21, 2023 07:19 PM2023-12-21T19:19:52+5:302023-12-21T19:20:18+5:30
सीसीटीव्हीच्या माध्यामासह प्रत्यक्ष पोलिसांनी कारवाई केली
सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस दलाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यामासह प्रत्यक्ष पोलिसांनी तब्बल २१ हजार ८५८ वाहनांवर कारवाई केली. या वाहनचालकांना १२ कोटी ९२ लाख ६०० रूपयांचा दंड ठोठवण्यात आला. वर्षाभरात ही कारवाई करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसात तब्बल ५४ लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
बेदकार वाहन चालवणे, मोबाईल बोलत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध ठिकाणी पोलिस दलाकडून शंभरावर सीसीटीव्ही लावण्यात आले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मुख्य रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित झाली.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मोबाईल डिव्हाईसद्वारे ‘ई-चलन’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. पोलिसांच्या या सातत्यपुर्ण कारवाईमुळे शहरासह जिल्हभरात वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील टप्प्यात ही कारवाई व्यापक प्रमाणवर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या पंधरा दिवसात लोक अदालतीद्वारे ७२०९ वाहनचालकांकडून ५३ लाख ८६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुढील टप्प्यात ही कारवाई आणखी व्यापक करण्यात येणार आहे. - मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक, वाहतूक शाखा