Sangli: तेरा वर्षांची विद्यार्थिनी अत्याचारातून गर्भवती, संशयित अटकेत; तासगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:48 PM2024-09-13T15:48:56+5:302024-09-13T15:49:43+5:30
अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना
तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावात आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. तिच्या आजीने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तासगाव पोलिसांनी संशयित पांडुरंग सोमलिंग कोळी (वय २७, सध्या रा. बिरणवाडी) यास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव तालुक्यातील एका गावात सोलापूर जिल्ह्यातील एक कुटुंब रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे. या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी आठवीत शिकत आहे. सोलापूर जिल्ह्यातून रोजगारानिमित्त आलेला पांडुरंग कोळी हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. पीडितेशी त्याची ओळख झाली होती. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन पांडुरंग याने तिला लग्नाचे आमिष दाखवले.
त्याने मे ते जून २०२४ रोजीच्या काळात तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केला. त्याबाबत कोणालाही माहिती द्यायची नाही, असे केल्यास ठार मारण्याची धमकी दिली, तसेच स्वतःचे बरे वाईट करून घेईन, असे धमकावले. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. नुकतेच पीडिता मुलगी गर्भवती राहिल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांना धक्का बसला.
पीडितेच्या आजीने तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले. पांडुरंग याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७६(२)(एन), ५०६, तसेच ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग कोळी याला अटक करून गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उपनिरीक्षक अविनाश घोरपडे तपास करत आहेत.