सीलबंद गोदामातून सव्वातीन कोटींची साखर चोरीस
By admin | Published: July 28, 2016 12:40 AM2016-07-28T00:40:25+5:302016-07-28T00:51:23+5:30
पोलिसांत तक्रार : केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केला पंचनामा
सांगली : थकीत अबकारी करापोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सील केलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून तीन कोटी ३0 लाखांची साखर चोरीस गेली आहे. याप्रकरणी विभागाच्या अधीक्षक उषा मौंदेकर यांनी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक, चीफ केमिस्ट आणि गोदामकीपर यांच्याविरुद्ध संजयनगर पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. अबकारी कराची थकबाकी वसूल न झाल्याने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने सप्टेंबर २0१५ मध्ये वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची दोन गोदामे सील केली आहेत. नोव्हेंबर २0१५ पासूनच्या अबकारी कराच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. जुन्या थकबाकीपोटीही साखर जप्त करण्यात आली होती. त्याचे पैसे भरल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामांची पाहणी केल्यानंतर, त्यांना या ठिकाणाहून ३२ हजार ९४0 पोती साखर गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक कमलाकर गुटे-पाटील, चीफ केमिस्ट व्ही. डी. चव्हाण आणि गोदाम किपर एस. डी. पाटील यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या या तक्रारीने कारखाना तसेच जिल्हाभर खळबळ माजली आहे. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गोदामांची पाहणी करून तक्रार दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे व पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गोदामांची पाहणी करून पंचनामा केला व रीतसर तक्रार नोंदवून घेतली आहे.
अबकारी कराच्या थकबाकीप्रकरणी गोदाम सील करण्याची कारवाई केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने केली होती. सेसमध्ये वाढ झाल्याने थकबाकीची रक्कम आता मोठी दिसत आहे. डिसेंबर २0१५ मधील साखर विक्रीवरील कराची ही रक्कम थकीत असल्याबद्दल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावली होती. त्यानंतरही कराचा भरणा झाला नसल्याने कारखान्याच्या मागील बाजूस असलेली दोन मोठी गोदामे सील करण्यात आली आहेत. त्याठिकाणची साखरही जप्त करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
चोरी नव्हे, साखरेचे स्थलांतर
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, कारखान्यातील या साखरेच्या सुरक्षेची जबाबदारी ही कारखान्यावरच सोपविली जाते. मध्यंतरी अतिवृष्टीमुळे कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून ते गोदामात शिरले होते. पाण्यात भिजून साखर खराब होऊ नये म्हणून आम्ही ती दुसऱ्या गोदामात स्थलांतरित केली आहे. साखर खराब झाली असती, तरीही त्याचा दोष आमच्यावरच आला असता. ज्या साखर पोत्यांबद्दल केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने तक्रार केली आहे, त्याची संपूर्ण रक्कम दंड, व्याजासहित आम्ही भरलेली आहे. याशिवाय जप्त केलेली साखर कारखान्यातून बाहेर गेलेली नाही. त्यामुळे हा चोरीचा प्रकार नाही. चौकशीत योग्य त्या गोष्टी समोर येतील, असे पाटील म्हणाले.
जिल्हा बॅँकही तपासणी करणार
जिल्हा बॅँकेकडून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास १५ कोटी रुपयांचे माल ताबेगहाण कर्ज दिले आहे. त्यामुळे एका गोदामातील ६० हजार ७९० पोती साखर जिल्हा बॅँकेच्या ताब्यात आहे. ही साखर सुरक्षित आहे की नाही, याबाबतची तपासणी जिल्हा बॅँकेचे अधिकारी आज, गुरुवारी करणार आहेत. ही साखर सुरक्षित असणार, असा विश्वास बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.