हे बंड राष्ट्रवादीविरुद्ध, सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या गोटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:39 PM2022-06-24T14:39:25+5:302022-06-24T14:50:12+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे नुकसान केले

This revolt is not against Shiv Sena but against NCP, Sangli Shiv Sena district chief in Eknath Shinde group | हे बंड राष्ट्रवादीविरुद्ध, सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या गोटात

हे बंड राष्ट्रवादीविरुद्ध, सांगलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या गोटात

Next

इस्लामपूर : आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेना कोणीही सोडणार नाही. आमचा रोष राष्ट्रवादीवर आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यातच जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करतानाच शिवसैनिकांवर गंभीर स्वरूपाच्या कारवाया पोलिसांकडून करवून घेतल्या. आमचे बंड हे पक्षाविरुद्ध नसून राष्ट्रवादीच्या विरोधात आहे असे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात उडी घेतली.

येथील शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पवार यांनी पत्रकार बैठक घेत आपण शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे जाहीर केले. पवार म्हणाले, शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना दिली होती. मात्र त्यांच्याकडून कसलाही आधार मिळाला नाही किंवा त्यांनी लक्षही घातले नाही. त्यातच पालकमंत्री जयंत पाटील हे नेहमीच शिवसेनेची गळचेपी करत आले आहेत. पोलीस, जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व विभागात त्यांनी शिवसैनिकांच्या कामाची अडवणूक करण्याचे आदेशच अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे बंड राष्ट्रवादीविरुद्धच आहे.

पालकमंत्र्यांनी निधी अडवून धरला

जिल्हास्तरीय समितीमध्ये शिवसैनिकांना डावलण्यात पालकमंत्र्यांची भूमिका आहे. जिल्हा नियोजनमधील एक पैशा निधी त्यांनी शिवसेनेला दिला नाही. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासाला दिलेला ११ कोटींचा निधी पालकमंत्र्यांनी अडवून धरला. मात्र आमच्या पाठपुराव्याने शिंदे यांनी तब्बल २१ कोटींचा निधी दिला. या निधीतूनच शहरातील रस्ते, गटारी व इतर विकासकामे सुरू आहेत.

राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे नुकसान केले

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडेही शिवसैनिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यावर पक्षाकडून काय कारवाई होते हे पहावे लागेल. सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीने शिवसेनेचे मोठे नुकसान केले आहे. राष्ट्रवादीच्या मनमानीविरुद्ध हे बंड आहे.आगामी पालिका निवडणूक ही विकास आघाडीसोबत शिवसेना म्हणूनच लढणार आहोत.

यावेळी दि.बा.पाटील, शकील सय्यद, सागर मलगुंडे, वीर कुदळे, राजेंद्र पवार, उमेश पवार, डॉ.सचिन पाटील, अंकुश माने, सतीश पाटील, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, योगेश हुबाले उपस्थित होते.

Web Title: This revolt is not against Shiv Sena but against NCP, Sangli Shiv Sena district chief in Eknath Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.