सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

By अशोक डोंबाळे | Published: September 24, 2022 01:34 PM2022-09-24T13:34:59+5:302022-09-24T13:35:51+5:30

ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

This year also FRP phase In Sangli District | सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

Next

अशोक डोंबाळे

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी उसाची एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचे यंदाही एफआरपीचे तुकडेच करण्याचे मनसुबे दिसून येत आहेत. शेतकरी म्हणतील, तशी एफआरपी देऊ, अशी वरकरणी भूमिका त्यांनी घेतली आहे. ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊसदराचा’, हे घोषवाक्य घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांची जनजागृती यात्रा दि. २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपीची घोषणा करून दराची कोंडी फोडली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी ठेवलेली नाही. टप्प्याटप्प्याने एफआरपी देणेच फायदेशीर असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दि. १५ ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद असून त्यानंतर कारखान्यांचे हंगाम सुरू होणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यात ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरला जमते, ते सांगलीत का नाही? : संदीप राजोबा

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी अडचणी कितीही आल्या तरी एकरकमी एफआरपी देणार, अशी घोषणा केली आहे. परंतु कोल्हापूरला लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र मागील वर्षापासून टप्प्याटप्प्याने एफआरपी देत आहेत. कोल्हापूरला जमत असेल तर सांगलीतील कारखानदारांनाच का जमत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी उपस्थित केला आहे.

...यंदा एकरकमीच एफआरपी

यावर्षी एकरकमीच एफआरपी मिळाली पाहिजे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. जे कारखाने ती देणार नाहीत, तेथे संघर्ष होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीचे तुकडे करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देणार : अरुण लाड

शासनाने टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचा कायदा केला आहे. तीन टप्प्यात दिलेल्या एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी येत आहेत. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने एफआरपी देत आहोत. तुकडे करतो, तरीही एफआरपीपेक्षा जादा पैसे देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांचे हित पाहत असून त्यामध्ये तडजोड करणार नाही. शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी मागितली तर तशीही देण्यात येईल, असे मत कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आ. अरुण लाड यांनी व्यक्त केले.

Web Title: This year also FRP phase In Sangli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.