जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन न करणाऱ्यांचे नूतनीकरण करू नये : चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:25 PM2019-07-03T14:25:28+5:302019-07-03T14:30:59+5:30
जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या वैद्यकीय आस्थापना याचे पालन करणार नाहीत, त्यांचे बाँबे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नूतनीकरण करू नये, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिल्या.
सांगली : जैववैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) अंतर्गत सांगली जिल्ह्यात शासकीय, खाजगी, शहरी व ग्रामीण आरोग्य सेवा राबवत असताना जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट व हाताळणीबाबत कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ज्या वैद्यकीय आस्थापना याचे पालन करणार नाहीत, त्यांचे बाँबे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नूतनीकरण करू नये, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिल्या.
बायोमेडिकल वेस्टसाठी सांगली जिल्हास्तरीय नियंत्रण समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उत्तम माने, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, इंडियन मेडिकल असोसिएशन, सांगलीचे अध्यक्ष डॉ. रणजीतसिंह जाधव, सूर्या बायोमेडिकलच्या व्यवस्थापिका मेघना कोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित इतर आस्थापना जसे की पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज, डे केअर सेंटर, डे केअर क्लिनिक, तसेच दंतशल्य चिकित्सकांचे दवाखाने या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जैववैद्यकीय कचरा निर्माण होतो, अशा सर्व ठिकाणी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम लागू आहे. त्यामुळे जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पदधतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जैववैद्यकीय कचरा संकलन, त्याचे विलगीकरण व विल्हेवाट या गोष्टी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. त्याचा वातावरणावर दुष्परिणाम होऊ नये. त्यामुळे जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी सूर्या कंपनीने सुरू केलेली बार कोड पद्धत चांगली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने त्यांचा बंद असलेला प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही करावी.
उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. आवश्यक तेथे वैद्यकीय आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जैववैद्यकीय कचरा निर्मिती व त्याची विल्हेवाट याबाबत आढावा घेण्यात आला. मेघना कोरे यांनी सूर्या कंपनीच्या प्रकल्पाबद्दल सादरीकरण केले. डॉ. संजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.