दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये
By admin | Published: February 19, 2017 12:28 AM2017-02-19T00:28:06+5:302017-02-19T00:28:06+5:30
मानसिंगराव नाईक : आरळा येथे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार
शिराळा : शिराळ्यात पक्षाचा, तर वाळव्यात दुसऱ्याच चिन्हाचा प्रचार करणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले.
आरळा (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादीचे पणुंब्रे तर्फ वारूण गटाचे उमेदवार शारदा पाटील व मणदूर पंचायत समिती गणाचे उमेदवार पी. वाय. पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख व श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर प्रमुख उपस्थित होते.
मानसिंंगराव नाईक म्हणाले की, विरोधक लबाड आहेत. त्यांचे जनतेशी घेणे-देणे नाही. ते फक्त स्वार्थ पाहतात. मंत्रिपदाच्या हव्यासापोटी मतदार संघाच्या विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. स्वार्थाने बरबटलेल्या या मंडळींनी स्वत:च्या संस्थांचा वापर राजकारणासाठी केला. सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या जातीयवादी पक्षाच्या कुटिल अजेंड्यात सहभागी विरोधकांचा दारुण पराभव करा.
सत्यजित देशमुख म्हणाले की, स्वार्थापायी जातीयवाद्यांशी हातमिळवणी केलेल्यांचा दारुण पराभव करण्यासाठी जनता सज्ज आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण आहे. पराभव दिसू लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते विषारी प्रचार करत आहेत.
संचालक शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. हणमंतराव पाटील, बाबालाल मुजावर, पी. वाय. पाटील, शारदा पाटील यांचे मनोगत झाले. यावेळी संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, सुशीला नांगरे, निलोफर डांगे, एस. वाय. कासार, वसंतराव येसले, बबन भुसारी, कैलास पाटील, यासीन डांगे, पोपट पाटील, हिंंदुराव नांगरे, शब्बीर मुजावर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
वेळीच सावध व्हा : भारत पाटणकर
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, जातीयवादी शक्तींचा पाडाव हाच एकमेव अजेंडा सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकरी जनतेने राबवावा. प्रत्येक पुरोगामी विचारसरणीच्या मतदाराने नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्यांना धडा शिकवावा. वेळेत सावध झालो नाही, तर वैचारिक आणि बौद्धिक गुलामगिरी आपल्यावर लादली जाईल.