लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकवावे, अदित्य ठाकरेंनी केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:28 AM2024-01-11T11:28:25+5:302024-01-11T11:29:39+5:30
इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका ...
इस्लामपूर : मुघल व औरंगजेबाने वाकडी नजर केली, त्याला महाराष्ट्राने झुकवले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनतेला अशीच भूमिका घेत लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना झुकविण्याचे काम करावे लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आघाडीतील सर्वांना सोबत घेत महाराष्ट्रासाठी लढणार आहेत. त्यासाठी जनतेने शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
इस्लामपूरजवळील वाघवाडी फाटा येथे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी आदित्य ठाकरे यांनी बुधवारी संवाद साधला. यावेळी खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख नितीन बाणुगडे-पाटील, अरुण दुधवडकर, माजी आमदार उल्हास पाटील, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, राज्यातील मिंधे-भाजप सरकार हे घटनाबाह्य असून ते गद्दारांचे, पक्ष फोडणारांचे, चोरांचे आहे. हे सरकार मी मानत नाही. ती राजवट आहे. या सरकारच्या काळात जातीय दंगलीमध्ये वाढ झाली आहे. जाती-जातीत भांडणे लावून तेढ निर्माण केली जात आहे. या राजवटीकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे. ते बदलायचे आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात एकही जातीय दंगल झाली नाही. राज्य पुढे जात होते. यांच्या काळात मात्र राज्य पिछाडीवर गेले आहे.