पैसाच हवा असणाऱ्यांनी डॉक्टर होऊ नये
By Admin | Published: June 30, 2016 11:18 PM2016-06-30T23:18:47+5:302016-06-30T23:33:53+5:30
अनिल मडके : सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव जिवंत
प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रातील सेवावृत्ती कमी होऊन व्यावसायिकता वाढतेय, अशी तक्रार होत असते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
उत्तर : नाही. सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात अजूनही सेवावृत्ती टिकून आहे. डॉक्टरांबद्दल एक गैरसमज पसरविला जात आहे. वास्तविक सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. लोकांची जीवनशैली बदलत आहे. चकाचक गोष्टी, सुंदरता आणि भव्यता या गोष्टींना प्राधान्य मिळताना दिसते. अनेकजण चैनीच्या गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. दुसरीकडे एकमेव वैद्यकीय क्षेत्र असे आहे, की जिथे चैन म्हणून कुणी येत नाही. अत्यावश्यक गोष्ट आणि नाईलाज म्हणून रुग्ण डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर कधीही दिखावूपणा करून रुग्णांना आकर्षित करीत नाही. डॉक्टरांच्या बुद्धिकौशल्यामुळे रुग्ण विश्वासाने त्यांच्याकडे येत असतात. हा फरक समजून घेतला पाहिजे.
प्रश्न : डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नातेसंबंधात अनेक अडचणी आता निर्माण होताना दिसतात. त्याचे कारण काय?
उत्तर : अशा काही घटना घडल्या असल्या तरी, आजही डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध विश्वासाच्या जोरावर टिकून आहे. डॉक्टर हासुद्धा माणूस आहे. त्याला कोणीही देव बनवू नये. बुद्धिकौशल्याच्या जोरावरच डॉक्टर रुग्णाला त्याच्या आजारातून मुक्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्याचदा रुग्णाला आणण्यास उशीर झालेला असतो. काहीवेळा रुग्ण सुस्थितीत वाटतो, पण आतून शरीरात मोठे बदल होत असतात. अशावेळी प्रयत्न करूनही रुग्ण दगावला, तर डॉक्टरवर संताप व्यक्त होत असतो. पण हे प्रमाण कमी आहे. बऱ्याचदा नातेवाईक समजून घेत असूनही बाहेरचे लोक अशा गोष्टी घडवून आणतात. तरीही आजही ९५ टक्क्याहून अधिक लोक डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. या गोष्टीचे भान डॉक्टरांनाही असते. त्यामुळेच डॉक्टरांचे कधीही रुग्णाकडे दुर्लक्ष होत नसते.
प्रश्न : डॉक्टरांची श्रीमंती हासुद्धा आता चर्चेचा प्रश्न बनला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते?
उत्तर : हो. डॉक्टरांच्या श्रीमंतीबाबतही अपप्रचार सुरू आहे. वास्तविक कोणताही डॉक्टर त्याचे निम्मे आयुष्य या क्षेत्रात खर्ची घालतो. शिक्षणापासून वैद्यकीय क्षेत्रातील त्याच्या दिवस-रात्र राबण्यापर्यंतचा काळ मोठा आहे. अशावेळी तो रुग्णसेवेसाठी सातत्याने आधुनिक तंत्र आणण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी या पेशाची कोणी इंडस्ट्री म्हणून ओळख करू पाहत असेल, तर चुकीचे आहे. वैद्यकीय क्षेत्राची कधीही इंडस्ट्री होऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडे सकारात्मकतेने पाहावे.
प्रश्न : या क्षेत्रात लोकांचे पर्यायाने समाजाचे आरोग्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचेच आरोग्य अडचणीत सापडले आहे का?
उत्तर : ही गोष्ट खरी आहे. सध्या सर्वच क्षेत्रातील लोकांची तुलना करता, डॉक्टरांचे वयोमान दिवसेंदिवस घटत आहे. जो डॉक्टर सर्वांना वेळेत जेवायला सांगतो, त्यालाच वेळेत जेवायला मिळत नाही. हा मोठा विरोधाभास आहे. डॉक्टरांना अकाली अनेक आॅपरेशन्स्ना सामोरे जावे लागत आहे. तो चोवीस तास कार्यरत असल्यासारखा आहे. दिवसभर १४ तासाहून अधिक काळ काम करताना रात्री-अपरात्रीही इमर्जन्सी आली तरी तो धावतो. या सर्व धावपळीत त्याचे वैयक्तिक आयुष्यही हरवते. कुटुंबाला तो वेळ देऊ शकत नाही. समाजाच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरांचेच आरोग्य आता अडचणीत सापडले आहे.
प्रश्न : आयएमए या संघटनेच्या माध्यमातून कोणती चळवळ तुम्ही उभी करू इच्छिता?
उत्तर : ही संघटना आम्हाला अधिक समाजाभिमुख करायची आहे. लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल काहीअंशी जी नकारात्मकता निर्माण झाली आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांसाठी हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जात आहे. दंडोबाच्या पायथ्याशी ५ एकर जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची जबाबदारी संघटनेच्या सर्व डॉक्टरांनी घेतली आहे.
प्रश्न : डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्यांना तुमचा काय संदेश असेल?
उत्तर : केवळ पैसाच हवा असणाऱ्यांनी डॉक्टर बनू नये. कारण याठिकाणी समाजभान, करुणाभाव, सेवाभाव यांची जास्त गरज आहे. त्यामुळे नव्या पिढीने या गोष्टींची मानसिकता असेल तरच या क्षेत्रात पाऊल टाकावे.
- अविनाश कोळी