३० हजार नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात; मदतीची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:12 AM2019-08-10T03:12:05+5:302019-08-10T03:12:18+5:30
सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ...
सांगली : जिल्ह्याला बसलेला महापुराचा विळखा अजूनही घट्टच आहे. वाढलेली नद्यांची पाणीपातळी मंदगतीने उतरत असल्याने धास्ती कायम आहे. अजूनी ३० हजार नागरिक पुराच्या विळख्यात असून काहींना होड्या पाठवून बाहेर काढण्यात आले.
सांगलीतील आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी मंदगतीने ओसरत आहे. पन्नासवर प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जवळपास १०० गावे महापुराने बाधित आहेत. यातील एकाही गावाची अद्याप सुटका झालेली नाही.
अडकलेल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी शुक्रवारी जादा कुमक मागवून प्रयत्न करण्यात आले. अनेक पूरग्रस्तांना सोडविण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस यश आले असले, तरी पुरात अडकलेल्या लोकांची संख्या अजूनही ३० हजाराच्या घरात आहे. हरिपूर, सांगलीवाडी येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकून आहेत. त्यांना अन्नाची पाकिटे हेलिकॉप्टरने देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची अजूनही कसरत सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दिवसभरात केवळ ३ इंच घट : सांगलीच्या आयर्विन पुलाजवळील पाणीपातळीत दिवसभरात केवळ तीन इंचांची घट झाली. सकाळी ७ वाजता ५७.५ फुटांवर असलेली पाणीपातळी सायंकाळी केवळ ५७.३ फूट झाली. पूर मंदगतीने ओसरत असल्याने जनजीवन ठप्पच आहे.
टँकरने पाणीपुरवठा : पूरग्रस्तांचे जेथे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याठिकाणी महापालिकेने टँकरने पाणीपुरवठा केला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने सर्व प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करता येणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने केवळ पाणीपुरवठा बंदचाच गजर सुरू केला आहे.