सांगलीमध्ये डेंग्यूसदृश तापाचे शंभरावर रुग्ण
By admin | Published: July 28, 2016 12:05 AM2016-07-28T00:05:25+5:302016-07-28T00:58:06+5:30
महापालिका सुस्त : शासकीय, खासगी रुग्णालयात गर्दी
सांगली : सांगली महापालिका हद्दीत डेंग्यूसदृश साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून, शंभरहून अधिकजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समजते. आतापर्यंत ३२ रुग्ण आढळले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यू उपायाबाबत उपाययोजना करण्यात महापालिका प्रशासन अयशस्वी ठरली आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
पावसाळ्यात साथीच्या रोगांमध्ये वाढ होत असते. त्यात डेंग्यूचा शहरात फैलाव झाल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरवड्यात डेंग्यूसदृश साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. शहरातील मुख्य भाग असलेल्या गावभाग व परिसरात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या परिसराबरोबरच संजयनगर, वारणाली, पत्रकारनगर, खणभाग, तर मिरज शहरातील विस्तारित भागातही डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे मोहीम सुरू केली असून, संशयित रुग्णांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. महापालिकेने सिव्हिलबरोबरच महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी यंत्रणा सज्ज केली असली तरी, खासगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होत आहेत.
याबाबत महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारूदत्त शहा यांनी सांगितले की, शहरात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. ज्या रुग्णांना थंडी, तापासह अंगदुखी, घसा दुखणे आदी लक्षणे दिसून येत आहेत, त्यांनी डेंग्यूची तपासणी करून घ्यावी व तात्काळ उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छ पाणी झाकून ठेवावे व आठवड्यातून एकदा सर्व पाण्याची भांडी कोरडी करून घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
जास्त शुल्क नको!
डेंग्यूच्या तपासणीसाठी सर्वच खासगी लॅबोरेटरींनी ६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ नये, असे आदेश देण्यात आले असून, सर्व खासगी रुग्णालये व लॅबोरेटरींना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.