‘व्हॉट्स अॅप’वरून पूरग्रस्त मुलांसाठी हजारो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:55 PM2019-08-19T23:55:53+5:302019-08-19T23:56:24+5:30
शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले.
सांगली : सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास संकटग्रस्तांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट नेर्ले (ता. वाळवा) येथील तरुणांनी दाखवून दिली. पूरग्रस्त गरीब कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्यासाठी राज्यभरातील हजारावर लोकांनी त्यांच्याकडे नोंदणी केली आहे. साहित्यरूपी मदत, औषधांचा पुरवठा करण्यातही या ग्रुपने मध्यस्थाची भूमिका पार पाडली.
नेर्ले येथील नीलेश साठे, डॉ. विजय चांदणे, प्रा. विजय लोहार, सुरेश पाटील, तानाजी साठे यांनी एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मोठा सेतू सोशल मीडियाद्वारे उभारला. नीलेश साठे यांना ही संकल्पना सुचली. त्यांनी सुरुवातीला पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपासाठी राज्यभरातील काही मित्रांचा व्हॉट्स अॅपवर ‘पूरग्रस्त मदत ग्रुप’ सुरू केला. प्रत्येकाने शंभर रुपये जमा करावेत आणि कोणाचे आणखी मित्र मदतीसाठी इच्छुक असतील, त्यांना या ग्रुपवर समाविष्ट करण्याचे आवाहन केले. शंभर ब्लँकेटपासून सुरू झालेल्या त्यांच्या कामाचा विस्तार वाढत गेला. जीवनावश्यक वस्तूंचे प्रत्येक पूरग्रस्ताच्या घरी जाऊन वाटप केले. त्याची छायाचित्रे ग्रुपवर प्रसिद्ध केली. ग्रुपने जिंकलेल्या विश्वासामुळे मदत करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
शिरगाव येथील महिलेचे घर महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ ग्रुपवरून व्हायरल केला. महिलेचे नाव, तिचा बँक खाते क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे राज्यभरातून दीड लाखाची मदत तिच्या खात्यावर जमा झाली. अशाचपद्धतीने त्यांनी गरीब पूरग्रस्तांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांना दत्तक घेण्यास कुणी इच्छुक आहे का, अशी विचारणा ग्रुपवरून केली. या विद्यार्थ्यांच्या किंवा तिच्या आईच्या बँक खात्यावर शैक्षणिक वर्षाचे दीड हजार जमा करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. त्यास प्रतिसाद मिळत राज्यभरातून एक हजारावर लोकांनी दत्तक योजनेसाठी नोंदणी केली.
थेट लाभाची यंत्रणा
सांगलीतील आरोग्य विभागाला औषधांचाही मोठ्या प्रमाणावर या ग्रुपने पुरवठा केला. अनेक शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटना या ग्रुपशी संपर्क करून आवश्यक गोष्टींची मागणी करीत आहेत. पूरग्रस्तांना थेट लाभ देण्याची यंत्रणा या ग्रुपने उभारली आहे. आजअखेर २0 हजार पूरग्रस्तांच्या घरांपर्यंत हा ग्रुप पोहोचला आहे.