मागणी नसल्यामुळे साडेबारा हजार किलो बियाणे कंपन्यांना परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:11 PM2019-07-24T12:11:08+5:302019-07-24T12:12:24+5:30
सांगली जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.
सांगली : जिल्ह्यातील तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्रातील पेरणीसाठी ४७ हजार ३७२ क्विंटल बियाणे आणि एक लाख २५ हजार ७१० टन खताची मागणी केली होती. जवळपास दीड लाख हेक्टवर पेरणीच झाली नसल्यामुळे कृषी दुकानदारांनी बारा हजार ४५६ किलो बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले आहे. तसेच जिल्ह्यात एक लाख टन रासायनिक खत मागणी नसल्यामुळे शिल्लक आहे.
जिल्ह्यात खरीप पेरणीचे तीन लाख ४८ हजार ४९० हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयाबीनचे १७ हजार १४८ क्विंटल, ज्वारी सहा हजार ८७ क्विंटल, बाजरी एक हजार ६५२ क्विंटल, तूर ५१९ क्विंटल, तर मका पाच हजार ३२६ क्विंटल अशा एकूण ४८ हजार क्विंटल बियाणांची मागणी केली होती. त्यानुसार बियाणांचा पुरवाठाही झाला. पण, कृषी दुकानदारांनी मागणीच नसल्यामुळे बारा हजार ४५६ क्विंटल बियाणे कंपन्यांकडे परत पाठविले.
सध्या जिल्ह्यात एक हजार ८०२ क्विंटल बियाणे कृषी दुकानदारांकडे शिल्लक आहे. दुकानदारांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दुष्काळामुळे बियाणे विक्री थंडावली असल्याचे सांगितले.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एक लाख सहा हजार ४७२ मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यात युरिया २० हजार ९४५ टन, डीएपी १७ हजार ८०९ टन, एमओपी २० हजार ३६५ टन, एसएसपी १९ हजार १७२ टन, एनपीके २८ हजार १८१ टन, तर मिश्रखते ५ हजार टन अशी मागणी केली होती. यापैकी एक लाख आठ हजार ६०८ टन खताचा पुरवठा झाला आहे.
या रासायनिक खतालाही जिल्ह्यात फारशी मागणी नाही. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागामध्येच रासायनिक खताचा पुरवठा होत आहे. उर्वरित पाच दुष्काळी तालुक्यातून मागणी नाही.