ऑफिस सुटते पाच वाजता, घरी पोहोचायला वाजतात रात्रीचे दहा; महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लहरी वेळापत्रकामुळे नोकरदारांची ससेहोलपट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:59 AM2023-10-14T11:59:21+5:302023-10-14T11:59:47+5:30
लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही
सांगली : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ बदलल्याने हजारो प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांच्या तक्रारीला परप्रांतीय अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पाच वाजता कामावरुन सुट्टी झालेल्या नोकरदारांना रात्री साडेआठ वाजता रेल्वे मिळत आहे. परिणामी घरी पोहोचायला चक्क दहा वाजत आहेत.
कोरोनापूर्वी ही एक्स्प्रेस दुपारी ३.३० वाजता कोल्हापुरातून सुटायची. मिरजेत पावणेपाच व सांगलीत पाच वाजता यायची. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, मिरजेतील हजारो नोकरदारांना घरी वेळेत पोहोचणे शक्य होते. कोरोनानंतर गाडीची वेळ बदलली असून, कोल्हापुरातून दुपारी पावणेतीन वाजता सोडली जात आहे. मिरजेत पावणेचार व सांगलीत चार वाजताच येऊ लागली आहे. त्यामुळे नोकरदारांना गाडी मिळेना झाली आहे. साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी या गाडीनंतर रात्री उशिरापर्यंत दुसरी गाडी नाही. त्यामुळे प्रवासी हैराण आहेत.
वेळ पूर्ववत करावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु आहे. पण, पुणे विभागातील उत्तर प्रदेश, बिहारच्या अधिकाऱ्यांना मराठी प्रवाशांच्या त्रासाची पर्वा नाही. त्यांच्या मर्जीवर गाडी धावत आहे. त्यामुळे यामध्ये प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.
लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही
पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत ` वेळ बदलू ` असे सांगणारे अधिकारी नंतर मात्र पाठ फिरवतात. त्रस्त प्रवाशांनी खासदार संजय पाटील, धैर्यशील पाटील यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. पण, कोणीही पाठपुरावा केलेला नाही.
दुहेरीकरणानंतर पुन्हा वेळ बदलणार
पुणे - मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर एक्स्प्रेस गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ पुन्हा बदलली जाणार आहे. अर्थात, दुहेरीकरणानंतर गाड्या वाढणार असल्याने सायंकाळच्या प्रवाशांना एखादी गाडी मिळण्याची आशा आहे.
महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदलाची शक्यता कमी आहे. या गाडीला पुढे अन्य गाड्यांची कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून वेळ बदलण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. दुहेरीकरणानंतर नवीन पॅसेंजर मागणे हाच तूर्त उपाय आहे. - सुकुमार पाटील, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे.