Sangli: हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतरिक्ष महायात्रा, इस्त्रोचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 19:07 IST2025-01-04T19:06:55+5:302025-01-04T19:07:37+5:30
सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा ...

Sangli: हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतरिक्ष महायात्रा, इस्त्रोचा उपक्रम
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरिक्ष महायात्रा या विज्ञान विषयक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आलेल्या बसमध्ये ठेवलेल्या विज्ञान विषयक उपकरणांची तालुक्यातील २२ शाळांमधील साडेतीन हजारावर विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, मारुती पाटील शास्त्रज्ञ (मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती.
इस्त्रोच्यामार्फत देशात सर्वत्र अंतरिक्ष महायात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यात विज्ञान विषयक उपकरणांचे प्रदर्शन घडवणारी बस दाखल झाली आहे. शिराळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सदरची बस आलेली होती. यामध्ये इस्त्रोद्वारा निर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती, माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. बाहेरील बाजूस आर्यभट्ट, रोहिणी, भास्कर या उपग्रहांच्या प्रतिकृती आहेत. बसमध्ये आतील भागात भारताने बनवलेल्या विविध प्रक्षेपण यानांच्या प्रतिकृती आहेत. चांद्रयान, मंगळयान, उपग्रहांचं दळणवळण याविषयी माहिती आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
एक दिवसासाठी शिराळा तालुक्यात आलेली ही बस पाहण्यासाठी तालुक्यातील विविध २२ शाळांमधील विद्यार्थी शिराळा येथे गेले होते. सदर बसमधील विज्ञान विषयक उपकरणे यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही पर्वणी ठरली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल शिराळाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात रांगोळी, प्रयोगशाळा साहित्य, विविध रसायने, प्राणी व वनस्पती यांचे नमुने, सुसज्ज ग्रंथालय, विश्वकोश, विज्ञान विषयक पुस्तके आदी बाबी पाहण्याची संधी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली.
अंतरिक्ष महायात्रा या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना अंतराळात उपग्रह कसे काम करतात याची सखोल माहिती मिळाली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या मनात रुजण्यास मदत झाली. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही वैज्ञानिक सहल होती. - संजय पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा गणित विज्ञान अध्यापक संघ.