सांगलीत हजारांहून अधिकांची पुरातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:30+5:302021-07-26T04:24:30+5:30
सांगली : कृष्णा नदीच्या महापुराचा फटका शहरातील तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना बसला आहे. रविवारी काही उपनगरांत पाणी शिरले ...
सांगली : कृष्णा नदीच्या महापुराचा फटका शहरातील तब्बल पन्नास हजारांहून अधिक नागरिकांना बसला आहे. रविवारी काही उपनगरांत पाणी शिरले असून, तेथील शेकडो कुटुंबे पुरात अडकली आहेत. बोट, ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी त्यांना हलविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने हजारांहून अधिक जणांची महापुरात सुटका केली आहे.
रविवारी श्यामरावनगर, व्यंकटेशनगर, रतनशीनगर या परिसरांत पुराचे पाणी शिरले. या परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. ज्या भागात पुराचे पाणी कमी आहे, त्या भागांत ट्रॅक्टर, ट्रकच्या साहाय्याने नागरिकांचे साहित्य बाहेर काढण्यात आले. गावभागात नगरसेवक युवराज बावडेकर यांनी ट्रॅक्टरमधून लोकांचे स्थलांतर केले. नगरसेवक मनोज सरगर, अमर निंबाळकर यांनीही आठ ते दहा कुटुंबांना बाहेर काढले. अनेक कुटुंबे पुरात अडकली. अनेकांनी दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यांवर आश्रय घेतला आहे. या कुटुंबांना सामाजिक संस्थांच्या वतीने दूध, पाणी, बिस्किटे यांचा पुरवठा करण्यात आला. या परिसरात अपार्टमेंट्स वगळता इतर घरांतील लोकांनी स्थलांतर केले आहे. महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख चिंतामणी कांबळे व त्यांचे पथक पूरग्रस्त भागात बोटी घेऊन तैनात आहे.
चौकट
नागरिकांकडून सतर्कता
२०१९ च्या पुराचा अनुभव गाठीशी असलेल्या सांगलीकरांनी यंदा मात्र सतर्कता दाखविली. प्रशासनाकडून पाण्याची पातळी ५२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला होता. ही पातळी गृहीत धरून अनेक नागरिकांनी स्वत:हून स्थलांतर केले. त्यासाठी महापालिकेेनेही त्यांना मदत केली. अपार्टमेंटमधील लोक मात्र पुराचे पाणी ओसरले असेल, या आशेने घरात अडकले आहेत.