जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:50 AM2021-03-13T04:50:29+5:302021-03-13T04:50:29+5:30
सांगली : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ...
सांगली : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक ४३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे तर सध्या ३२५ रुग्ण उपचाराखाली आहेत.
जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. फेब्रुवारी महिन्यातही फारशी वाढ झाली नाही. परंतु, मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शुक्रवारी महापालिका क्षेत्रात १७ रुग्ण आढळले. त्यात सांगलीत १२, तर मिरजेत ५ रुग्णांची नोंद झाली. तासगाव आणि कडेगाव तालुक्यात प्रत्येकी एक, आटपाडी ४, जत ३ तर खानापूर व मिरज तालुक्यात ५ रुग्ण आढळले. वाळवा तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या ५३८ चाचण्या करण्यात आल्या, त्यात २९ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. अँटिजेनच्या ५४५ चाचण्यांत १९ रुग्ण सापडले. सध्या ४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३१, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ७, तर नाॅन इन्व्हेझिव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत. कोल्हापूर, सोलापूर येथील प्रत्येकी एक तर पुणे येथून तीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून, परजिल्ह्यातील २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चौकट
एप्रिल महिना धोकादायक : कापडणीस
सध्या महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ते मध्यापर्यंत कोरोनाची परिस्थिती गतवर्षीप्रमाणे होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करावा तसेच ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी व्यक्तीने कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.