जिल्ह्यातील २२४ वाड्या तहानलेल्याच!

By admin | Published: January 8, 2016 11:39 PM2016-01-08T23:39:20+5:302016-01-09T00:46:30+5:30

टंचाई परिस्थिती गंभीर : टँकरने पाणीपुरवठा सुरू; जलस्रोतांनी गाठला तळ; दुष्काळाचे संकट

Threatened 224 places in the district! | जिल्ह्यातील २२४ वाड्या तहानलेल्याच!

जिल्ह्यातील २२४ वाड्या तहानलेल्याच!

Next

शरद जाधव -- सांगली
टॅँकरमुक्तीसाठी योजना राबवूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील २२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. या भागाला टॅँकरने पाणीपुरवठा करत तात्पुरती मलमपट्टी करण्यात येत असली तरी, टॅँकरमुक्त गावांसाठी अजून उपाययोजनांची आवश्यकता आहे. टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या भागात आता जलस्रोतही आटत चालल्याने ऐन उन्हाळ्यात या वाड्यांची तहान भागवायची कशी, या चक्रव्यूहात यंत्रणा अडकली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळ आणि त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य हे नेहमीचेच चित्र आहे. या भागात काही प्रमाणात पाणी योजनांचे आवर्तन पोहोचल्याने दिलासा मिळत असला तरी, यावर्षी मात्र हिवाळ्यापासूनच टंचाई परिस्थिती गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. यामुळेच जिल्ह्यातील ३३ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांतर्गत अथवा जवळच्या अशा २२४ वाड्यांवर आतापासूनच तीव्र टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्यावतीने जत तालुक्यात ३१ गावात, तर तासगाव तालुक्यात नागेवाडी, खानापूर तालुक्यात पळशी या गावांना आता पावसाळा येईपर्यंत म्हणजेच सहा महिने टॅँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागणार आहे.
जिल्ह्यातील २२४ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा होत असला तरी या टॅँकरसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींनीही आता तळ गाठण्यास सुरुवात केल्याने या भागात पाणी द्यायचे तरी कोठून, अशी अडचण शासकीय यंत्रणेपुढे आहे. सध्या म्हैसाळ योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी त्याचा लाभ या टंचाईग्रस्त भागातील किती गावांना, वाड्यांना मिळणार, याबाबत साशंकता आहे.
टॅँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या भागातील ग्रामस्थांवर टॅँकरची वाट पाहण्याची वेळ आली आहे. पाण्याचा वाढता वापर आणि वाटप होणारे कमी पाणी यामुळे आता हिवाळ्यातच टॅँकर येताच पाण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होताना दिसत आहे. ज्यांना पाणी मिळाले नाही, त्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. ज्या गाावात टॅँकरने पाणीपुरवठा होतो, तेथे प्रशासनाच्यावतीने पाण्याची साठवण करण्यासाठी टाक्यांची व्यवस्था केलेली नाही. काही ठिकाणी मात्र सामाजिक संस्थांनी दिलेल्या टाक्यांचा आधार घेत साठवण होत आहे. टंचाई निवारणासाठी शासन स्तरावरून आजपर्यंत योजनांचा अगदी ‘पाऊस’ पाडण्यात येत असला तरी, अशा योजनांमुळे ‘टंचाई’ काही मिटली नसल्याने, कुचकामी योजनांच्या अंमलबजावणीबाबत गावकऱ्यांत पुरता असंतोष आहे.
उन्हाळा तोंडावर आलेला असताना, तहानलेल्या वाड्यांच्या, गावांच्या संख्येत वाढच होत चालल्याने पाण्यासाठी भटकंती हा या गावांचा दिनक्रम ठरत आहे. असे विदारक चित्र दिसून येत आहे.


टंचाई निवारणासाठीचे उपाय ठरले कुचकामी
जिल्ह्यातील पूर्वभागातील पाच तालुक्यांतील टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अनेक योजना आणि उपाययोजना राबवत टंचाई आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने सध्या तरी या योजना कुचकामी ठरल्या आहेत.

जलस्रोत आटू लागले
वाढत चाललेल्या उन्हामुळे अगोदरच टंचाईच्या झळा सोसणाऱ्या भागातील जलस्त्रोत वेगाने आटत चालल्याने पाणीटंचाई वाढत चालली आहे. शासनाने टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरीही कोरड्या पडत चालल्याने आता ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाची खरी कसोटी लागणार आहे.

५७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा
ग्रामपंचायतींना नोटिसा : पाण्यामध्ये टीसीएल पावडर वापराकडे दुर्लक्ष
सांगली : जिल्ह्यातील एक हजार ७३५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये ५७ गावांतील पाण्याचे ८५ नमुने दूषित आढळून आले आहेत. काही गावांमध्ये ग्रामस्थांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये टीसीएल पावडरही वापरली जात नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटिसा बजावून, दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना दिली आहे.
जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात पाऊस कमी पडल्यामुळे तेथे पाण्याची टंचाई आहे. पाण्याचे जे स्रोत आहेत, तेही दूषित असल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेतर्फे डिसेंबर २०१५ मध्ये जिल्ह्यातील पाण्याचे एक हजार ७३५ नमुने तपासले होते. यामध्ये ८५ नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये जत तालुक्यामधील उटगी, उटगीतांडा, रामपूर गावांतील पाण्याचे सहा नमुने दूषित आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी, कोकळे, कोंगनोळी, बसाप्पावाडी, रांजणी, आटपाडी तालुक्यातील आटपाडी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, निंबवडे, वाक्षेवाडी, पात्रेवाडी, गोमेवाडी, मिटकी, पडळकरवाडी, पिंपरी बु., शिराळा तालुक्यातील करमाळे, येळापूर, शेडगेवाडी, शिरसटवाडी, रांजणवाडी, खुंदलापूर, सोनवडे, देववाडी, भाटशिरगाव, बांबवडे, वाळवा तालुक्यातील पोखर्णी, गोटखिंडी, बावची, मिरजवाडी, विठ्ठलवाडी, येडेनिपाणी, कुरळप, करंजवडे, ढगेवाडी, कार्वे, देवर्डे, चिकुर्डे, ऐतवडे बुदुक, येडेमच्छिंद्र, शिरटे, येलूर, ताकारी, खानापूर तालुक्यातील रेवणगाव, मिरज तालुक्यातील भोसे, कवलापूर, कौलगे, सावर्डे, पेड, कचरेवाडी, बस्तवडे, नागाव आदी गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Threatened 224 places in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.