विट्यात आज रंगणार पालखी शर्यतींचा थरार--पोलिस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:04 PM2017-09-29T23:04:47+5:302017-09-29T23:05:41+5:30
विटा : संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या येथील दोन देवांच्या पालख्यांच्या शर्यती विजयादशमीदिवशी शनिवारी होत
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या येथील दोन देवांच्या पालख्यांच्या शर्यती विजयादशमीदिवशी शनिवारी होत असून, या उत्कंठावर्धक पालखी शर्यतीसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी शर्यतीवेळी हुल्लडबाजी करणाºयांवर आता पोलिसांच्या आठ व्हिडीओ कॅमेºयांची नजर राहणार आहे. हुल्लडबाजी करून कायदा व सुव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न करणाºयांवर दिसताक्षणीच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
येथे विजयादशमीदिवशी मूळस्थान रेवणसिध्द व विटा येथील श्री रेवणसिध्द या देवांच्या पालख्यांच्या शर्यती होतात. दीडशे वर्षांची ही परंपरा विटेकरांनी आजही जपली आहे. विजयादशमीला शनिवारी विट्यात या पालखी शर्यती होत आहेत. सायंकाळी पाच वाजता पालख्यांच्या शर्यतीस सुरुवात होणार असून काळेश्वर मंदिरापासून सुरू होणाºया पालखी शर्यतीची खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदानात सांगता होणार आहे. पालखी शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असते. त्यात काही हुल्लडबाजी करणाºया तरूणांचाही समावेश असतो. त्यामुळे या ऐतिहासिक पालखी शर्यती सुस्थितीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस व नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पालखी शर्यतीच्या मार्गावरील रस्त्यातील खड्डे पालिका प्रशासनाने भरून घेतले असून, रस्ता दुभाजकावरील जाहिरातींचे फलकही हटविले आहेत. तसेच शिलंगण मैदान व रस्ते चकाचक केले आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने विटा पोलिसांनीही कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर व पोलिस निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली २३ पोलिस अधिकारी, २०६ पोलिस कर्मचाºयांसह २० होमगार्ड व राज्य राखीव पोेलिस दलाची एक तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी मार्गावर चित्रीकरणासाठी पोलिसांनी आठ व्हिडीओ कॅमेरे तयार ठेवले आहेत.
शहरातील वाहतूक : मार्गात बदल
पालखी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर अर्धा ते पाऊण तासासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. कºहाड रस्त्यावरील वाहतूक प्रसाद थिएटर, चौंडेश्वरी चौक, जुना वासुंबे रोड मार्गे, तर खानापूर रस्त्याची वाहतूक खानापूर नाका, घुमटमाळ, पारे रोड मार्गे तासगाव रस्त्याकडे वळविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.