अटकेच्या भीतीने पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे फरार

By admin | Published: July 15, 2016 11:31 PM2016-07-15T23:31:15+5:302016-07-15T23:56:03+5:30

संशयिताची आत्महत्या : सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचे सीआयडी पथक मागावर; सोलापूरमध्ये छापे

Three absconding, including the police officials, were afraid of the arrest | अटकेच्या भीतीने पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे फरार

अटकेच्या भीतीने पोलिस अधिकाऱ्यांसह तिघे फरार

Next

सांगली/उमदी : धुमकनाळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील चंद्रशेखर नंदगोंड (वय ३०) या तरुणाने पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने उमदी (ता. जत) पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे, उपनिरीक्षक राजाराम चिंचोळीकर व हवालदार प्रमोद रोडे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाची तीन पथके तैनात केली आहेत. पथकांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यासह मिरज तालुक्यात छापे टाकले; पण त्यांचा सुगावा लागलेला नाही.
उमदी येथे गेल्या महिन्यात झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोंड यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ६ जूनला त्याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाइकांनी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सांगलीच्या सीआयडी विभागाकडे सोपविली होती. या विभागाचे पोलिस उपअधीक्षक एन. आर. पन्हाळकर, निरीक्षक गीता बागवडे, हवालदार संजय कुलगुटगी, विजय चौगुले यांच्या पथकाकडून गेल्या दीड महिन्यापासून चौकशी सुरू होती. यामध्ये पोलिसांची मारहाण तसेच डांबूून ठेवल्याच्या भीतीने नंदगोंड याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यानुसार उपअधीक्षक पन्हाळकर यांनी गुरुवारी वाघमोडे, चिंचोळीकर या दोन अधिकाऱ्यांसह हवालदार रोडे याच्याविरुद्ध डांबून ठेवणे, मारहाण करणे व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच या तिघांनी अटकेच्या भीतीने पलायन केले आहे. वाघमोडे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचे, तर चिंचोळीकर भंडारकवठे गावचे आहेत. रोडे मिरज तालुक्यातील आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सीआयडीची तीन स्वतंत्र पथके तैनात केली आहेत. सांगलीच्या पथकातील निरीक्षक गीता बागवडे, हवालदार संजय कलगुटगी यांच्या पथकाने गुरुवारी रात्री, तसेच शुक्रवारी उमदीत जाऊन चौकशी केली, पण अटकेच्या भीतीने हे तिघेही फरार झाल्याची माहिती मिळाली. त्यांचे मोबाईलही बंद आहेत. कोल्हापूर व सातारच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात छापे टाकून वाघमोडे व चिंचोळीकरचा शोध घेतला; परंतु सुगावा लागलेला नाही. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तिघेही न्यायालयातून जामीन घेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पथकास मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी तीन जिल्ह्यांतील पथके मागावर सोडण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
--------------
‘थर्ड डिग्री’चा वापर!
महिलेच्या खूनप्रकरणी नंदगोंड यास ४ जूनला ताब्यात घेतले होते. मृत महिलेच्या मोबाईलवर शेवटचा कॉल त्याचाच होता. त्याच्याविरुद्ध पुरावेही भरपूर होते. उमदी पोलिस त्याला अटक करू शकत होते, पण त्यांनी तसे केले नाही. गुन्हा कबूल करण्यासाठी त्यांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर केल्याचे सीआयडीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्याला पट्टा तसेच काठीने बेदम मारहाण केली. तीन दिवस त्यास डांबून ठेवले. पोलिसांच्या मारहाणीला घाबरुनच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाची विच्छेदन तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याच्या अंगावर एकूण १२ जखमा आढळून आल्या आहेत. यातील गळ्यातील एक जखम त्याने गळफासाने आत्महत्या केल्याची आहे. उर्वरित ११ जखमा पोलिसांच्या मारहाणीतील असल्याचे स्पष्ट झाले होते. या महत्त्वाच्या पुराव्यावरच वाघमोडे, चिंचोळीकर व रोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसप्रमुखांना अहवाल
वाघमोडे, चिंचोळीकर व रोडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती व त्यासंदर्भातील अहवाल उपअधीक्षक पन्हाळकर यांनी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना सादर केला आहे. त्यामुळे पोलिसप्रमुखांकडून लवकरच या तिघांवर पुढील कारवाई, तसेच खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे.
संख चौकीतील चौकशी
नंदगोंड याने आत्महत्या करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर उमदी पोलिस ठाणे हद्दीतील संख पोलिस चौकीत एका संशयिताचा मृत्यू झाला होता. पत्नीसोबत केलेल्या भांडणातून या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचीही सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये आणखी किती पोलिस अडकणार? अशी शुक्रवारी चर्चा सुरूहोती.

Web Title: Three absconding, including the police officials, were afraid of the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.