इस्लामपुरात दुकान फोडून साडेतीन लाखांच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:40+5:302021-07-30T04:28:40+5:30
फोटो-इस्लामपुरातील शामशिव सेल्स या ऑटोमोबाइल दुकानातील साहित्य चोरट्यांनी असे विस्कटून टाकले होते. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील कोल्हापूर ...
फोटो-इस्लामपुरातील शामशिव सेल्स या ऑटोमोबाइल दुकानातील साहित्य चोरट्यांनी असे विस्कटून टाकले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील कोल्हापूर रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या शामशिव सेल्स हे ऑटोमोबाइल दुकान फोडून चोरट्यांनी तीन लाख ५६ हजार रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली. तसेच साडेतीन हजार रुपयांची रोकड लुटली. ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली. याबाबत संदीप सदाशिव धुमाळ (रा. धुमाळवाडी-रेठरे धरण) यांनी गुरुवारी पोलिसात फिर्याद दिली.
शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास संदीप यांचे धाकटे भाऊ मयूर यांनी दुकानातील पावसाळी कोट घेऊन दुकान बंद केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने दुकान बंद होते. या बंदच्या कालावधीत चोरट्यांनी धुमाळ यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ही चोरी केली.
चोरट्यांनी दुकानातील साहित्य विस्कटून टाकले होते. आतील लॅपटॉप, प्रिंटर आणि सर्व प्रकारच्या स्पेअर पार्टवर चोरट्यांनी हात मारला. तसेच टेबलच्या ड्रॉवरमधील ३५०० रुपयांची रोकड चोरली. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुकान जागेचे मालक धनाजी जाधव यांच्या निदर्शनास धुमाळ यांच्या दुकानाची कुलपे तोडल्याचे निदर्शनास आले. चोरीची शंका आल्याने त्यांनी संदीप धुमाळ यांना ही माहिती दिली. त्यांनी येऊन पाहिल्यावर दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले.
चौकट
सीसीटीव्ही कक्षेत दुकान
कोल्हापूर नाक्यावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. धुमाळ यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्ता या यंत्रणेच्या कक्षेत येतो. त्यामुळे या मोठ्या चोरीचा छडा लावणे पोलिसांसाठी सुलभ होणार आहे. सोमवारपासून पोलिसांच्या संपर्कात असल्याचे संदीप धुमाळ यांनी सांगितले. त्यावर गुरुवारी त्यांची फिर्याद घेण्यात आली. शहरात प्रवेश करणाऱ्या या मुख्य रस्त्यावरच चोरट्यांनी दुकानाची तीन कुलपे तोडून चोरी केल्याने परिसरातील अन्य व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत.