दहा लाखांचे सोने लुटल्याप्रकरणी दोन लष्करी जवानांसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:28 AM2021-04-01T04:28:19+5:302021-04-01T04:28:19+5:30

लाेकमत न्युज नेटवर्क मिरज : मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असल्याची बतावणी करून दहा लाख किमतीचे २४ तोळे सोने ...

Three arrested along with two Army personnel for looting gold worth Rs 10 lakh | दहा लाखांचे सोने लुटल्याप्रकरणी दोन लष्करी जवानांसह तिघांना अटक

दहा लाखांचे सोने लुटल्याप्रकरणी दोन लष्करी जवानांसह तिघांना अटक

Next

लाेकमत न्युज नेटवर्क

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात पोलीस असल्याची बतावणी करून दहा लाख किमतीचे २४ तोळे सोने लुटल्याप्रकरणी दोन लष्करी जवानांसह तिघांना रेल्वे पोलिस‍ांनी अटक केली. सचिन शंकर चव्हाण (वय ३०) राहुल शंकर चव्हाण (वय २६) हे लष्करी जवान सख्खे भाऊ व त्यांचा साथीदार अतुल ऊर्फ शिवाजी नामदेव सूर्यवंशी (रा. फडतरवाडी, ता. अथणी) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले. तिघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली.

पंजाबमधील अमृतसर येथे गलाई काम करणारे ज्योतीराम पाटील (वय ३५, रा. कनवाड ता. शिरोळ) हे निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेसने सोने घेऊन मिरजेत आले. शनिवारी दुपारी चार वाजता एक्स्प्रेस मिरज स्थानकात आल्यानंतर रेल्वेतून उतरून बाहेर पडल्यानंतर स्थानकासमाेर थांबलेल्या दोघांनी त्यांना अडविले. ‘आम्ही पोलीस आहोत, तुम्ही विनापरवाना सोने आणले आहे’ असे म्हणत त्यांच्या हातातील २४ तोळे सोन्याचे कडे घेऊन दोघांनी पलायन केले. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयितांचा शोध सुरू केला.

महादेव पाटील हे अमृतसर येथे मामा संजय पाटील यांच्या दुकानात सोने गाळप काम करतात. मामाचे सोने घेऊन ते गावाकडे येत होते. सोने घेऊन येताना पुण्यात पोलिसांकडून तपासणी होण्याच्या भीतीने ज्योतीराम पाटील यांनी आरक्षित बोगीतील सहप्रवासी लष्करी जवान सचिन चव्हाण यांच्याकडे सोन्याचे कडे ठेवण्यास दिले. सातारा स्थानकात ज्योतिराम पाटील यांनी चव्हाण यांच्याकडून सोन्याचे कडे परत घेतले. ज्योतिराम हे पोलिसांना घाबरत असल्याचे पाहून सचिन चव्हाण याने त्याचा गावाकडे सुटीवर आलेला लहान भाऊ राहुल यास ज्योतिराम याच्याकडून सोने काढून घेण्यासाठी मिरज स्थानकात येण्यास सांगितले. राहुल चव्हाण हा अतुल सूर्यवंशी या नातेवाईकास घेऊन मिरज स्थानकात आला. राहुल व अतुल यांनी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्धारातून बाहेर पडताना ज्योतिराम यास अडवून पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या हातातील सोन्याचे कडे काढून घेत पोबारा केला. ज्योतिराम यांच्याकडे सोने असल्याचे सहप्रवासी जवान सचिन चव्हाण यास माहिती असल्याने पोलिसांनी रेल्वे आरक्षण विभागाकडून सचिन चव्हाण याचा नाव पत्ता मिळवून त्यास ताब्यात घेतले. सचिन चव्हाण याने भाऊ राहुल व नातेवाइक अतुल सूर्यवंशी याच्या मदतीने सोने काढून घेतल्याची कबुली दिल्याने तिघांनाही अटक करण्यांत आली. सचिन चव्हाण हा हिमाचल प्रदेशात व राहुल चव्हाण पंजाबमध्ये लष्करात शिपाई आहे. रेल्वे पोलीस ठाण्याचे निरिक्षक संभाजी काळे व रेल्वे सुरक्षा दलाचे निरिक्षक सतबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केवळ चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दि. २ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Three arrested along with two Army personnel for looting gold worth Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.