पाडळीतील युवकावर हल्लाप्रकरणी तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:46+5:302020-12-27T04:20:46+5:30
पाडळी (ता. कडेगाव) येथील विशाल अशोक प्रताप या युवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन संशयित आरोपींची ...
पाडळी (ता. कडेगाव) येथील विशाल अशोक प्रताप या युवकावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणी वैभव राजाराम आवळे (वय २०) व सागर निवास धनवडे (२३, दोघेही रा. हडको कॉलनी शंभर फुटी रोड, मिरज) तसेच कृष्णात आनंदा पाटोळे (३४, रा. आसद ता. कडेगाव) यांना गजाआड करण्यात चिंचणी वांगी पोलिसांना यश आले आहे.
गुरुवार, दि. २४ डिसेंबर रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी माेटारीतून येऊन विशाल अशोक प्रताप यास घरातून बाहेर बोलवून घेऊन त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. याबाबत सुवर्णा संगम प्रताप यांनी (रा. पाडळी) यांनी चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवरुद्ध फिर्याद दिली होती. यामुळे हे अज्ञात व्यक्ती कोण हे शोधण्याचे चिंचणी (वांगी) पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलिसांनी तपास केला. जखमी विशाल प्रताप याची आणि आसद येथील कृष्णात आनंदा पाटोळे यांची यापूर्वी भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर कृष्णात पाटोळेकडे कसून चौकशी केली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून विशालचा कायमचा काटा काढायचा या उद्देशाने कृष्णात याने त्याचा मिरज येथील भाचा वैभव राजाराम आवळे याची मदत घेतली असल्याचे कबूल केले. हल्लेखोरांची नावेही निष्पन्न झाली. यानंतर सहायक फौजदार गोविंद चन्ने, हवालदार अमर जंगम, गणेश तांदळे यांनी मिरज येथे जाऊन वैभव आवळे व सागर धनवडे या दोघांनाही अत्यंत शिताफीने पकडले. तसेच कृष्णात आनंदा पाटोळे यालाही अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली माेटार (क्र. एमएच १२ बीव्ही ८८५९) जप्त केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी करीत आहेत.