सांगली, मिरजेत नशेच्या गोळ्यांची विक्री करणारे तिघे जेरबंद
By शरद जाधव | Published: July 2, 2023 06:38 PM2023-07-02T18:38:05+5:302023-07-02T18:38:13+5:30
महापालिका क्षेत्रात नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
सांगली : महापालिका क्षेत्रात नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. शाहबाज ऊर्फ जॅग्वार रियाज शेख (वय २४, रा. साईनाथनगर, कर्नाळ रोड, सांगली), सचिन सर्जेराव पाटील (२९, रा. वंजारवाडी ता. तासगाव) आणि अमोल शहाजी चव्हाण (३८, रा. बेंबळे चौक, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर), अशी संशयितांची नावे आहेत. यातील पाटील या वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर), तर चव्हाण औषधी विक्रेता आहे.
सांगलीत नशेसाठी गोळ्यांचा वापर वाढला होता याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी यातील संशयितांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे खास पथक याचा तपास करत होते. पोलिसांचे पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित शाहबाज ऊर्फ जॅग्वार शेख हा शिवशंभो चौकात येणार आहे. यावेळी सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने त्याचे साथीदार अनिकेत विजय कुकडे, उमर सलीम महात (दोघेही रा. सांगली) यांना नायट्रोव्हेटच्या १५० गोळ्या व नायट्रोजम १०० गोळ्या तर राहुल सतीश माने (रा. माजी सैनिक वसाहत, मिरज) याला ६८ गोळ्या, गौस हुसेन बागवान (रा. काझी वाडा, मोमीन गल्ली, मिरज) यांस ८० गोळ्या जादा दराने विक्री केल्याचे सांगितले.
या गोळ्या जॅग्वारने वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सचिन सर्जेराव पाटील याच्या मध्यस्थीने अमोल चव्हाण याच्याकडून खरेदी केल्याचेही सांगितले. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ऐदाळे, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, सागर लवटे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
एमआर पाटीलची मध्यस्थी
वंजारवाडी येथील सचिन पाटील हा पूर्वी वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करत होता. यावेळी त्याची टेंभुर्णी येथील अमोल चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. त्यातूनच या गोळ्या डॉक्टरांच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय व कोणतेही रेकॉर्ड न ठेवता दिल्या गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.