नळदुर्ग येथील बालकाच्या अपहणप्रकरणी सांगलीत तिघांना अटक
By शरद जाधव | Published: February 1, 2023 11:41 PM2023-02-01T23:41:57+5:302023-02-01T23:44:23+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वराजचे नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञातांनी अपहरण केले होते.
सांगली : नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील चारवर्षीय बालकाचे अपहरण करुन त्यास सांगली शहरातील रामनगरमध्ये ठेवलेल्या तिघांना सांगली शहर पोलिसांनी जेरबंद केले. स्वराज यल्लाप्पा चौगुले असे सुटका केलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. नळदुर्ग पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वराजचे नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञातांनी अपहरण केले होते. यानंतर निनावी क्रमांकावरून फिर्यादीशी संपर्क साधून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पोलीस तपासात हे अपहरण किरण अविनाश लादे (रा. सलोळे ता. मोहोळ जि. सोलापूर) याने किशोर शाहीर तांदळे (रा. हरिपूर) याच्या सहकार्याने केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर अपह्रत मुलास सांगलीतील रामनगर परिसरातील सुनील सदाशिव हजारे याच्याकडे ठेवल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई करीत तिघा संशयितांना जेरबंद करुन चिमुकल्याची सुटका केली. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.