वाळू माफियांच्या खड्ड्यात तीन बालकांचा बळी !
By admin | Published: October 18, 2015 12:24 AM2015-10-18T00:24:58+5:302015-10-18T00:24:58+5:30
येरळा नदीतील घटना : संतप्त नागरिकांनी फोडली तहसीलदारांची गाडी
वडूज/औंध : अंबवडे येथील येरळा नदीमध्ये वाळू माफियांनी खणलेल्या खड्ड्यात बहीण भावासह चुलत बहिणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही मुले नदीपात्रात खेळण्यासाठी गेली होती. या प्रकाराला वाळूमाफिया जबाबदार असल्याचा रोष व्यक्त करून संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची गाडी फोडली. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.
स्वप्निल तानाजी पवार (वय ११), स्मिता तानाजी पवार (१३), पूजा देविदास पवार (१२, सर्व रा. अंबवडे, ता. खटाव) अशी बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, भूतेश्वर विद्यामंदिर शाळेमध्ये शिकत असलेले पूजा पवार, स्मिता पवार आणि स्वप्नील पवार हे तिघे शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी गेले. त्यानंतर येरळा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी गेले. सुरुवातीला पूजा नदीत उतरली. तिच्या पाठोपाठ स्वप्निलही गेला; मात्र दोघेही बुडू लागल्याचे लक्षात येताच स्मिताने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली; मात्र तिही त्या खड्ड्यात बुडाली.
तुफान दगडफेक..
या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र वाळू माफियांविरोधात राग व्यक्त करत संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.