इस्लामपुरातील अपहरण प्रकरणातील तिघांना कोठडी :- सुनील कदम याचे निलंबन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:55 PM2019-06-06T23:55:29+5:302019-06-06T23:57:12+5:30
शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
इस्लामपूर : शहरातील ताकारी रस्त्यावरील खासगी शिकवणी वर्गातून १0 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीतील तिघांना येथील न्यायालयाने १0 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ३ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी सलग ३६ तास तपास करत यातील अपहृत मुलाची कोल्हापूर—शिरोली येथून सुखरुप सुटका केली.
वरदराज बाळासाहेब खामकर (रा. अक्षर कॉलनी, दत्तटेकडी इस्लामपूर) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे अपहरण करणाºया टोळीत त्याचा आत्येभाऊ पोलीस शिपाई सुनील मोहन कदम (३२, रा. शिरदवाड, ता. शिरोळ), गोपाल हिराप्पा गडदाकी (२२), विलास बरमा वरई (२0, दोघे रा. बुगडीकट्टी, ता. गडहिंग्लज) अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना गुरुवारी येथील न्यायालयासमोर उभे केले होते. संशयितांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली कार आणि दुचाकी हस्तगत करावयाची आहे, तसेच वरदराजचे अपहरण केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या आश्रयस्थानाची माहिती घ्यावयाची आहे, तसेच अपहरणाचे कारण निष्पन्न करण्यासाठी सरकार पक्षाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने तिघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
दि. ३ जून रोजी अत्यंत नाट्यमय पध्दतीने पोलीस असणारा आत्येभाऊ कदम याने वरदराजच्या वडिलांकडून २0 लाखांची खंडणी उकळण्यासाठीच हे अपहरण घडवून आणले. मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत कारवाईचा फास सुनील कदम याच्याभोवती आवळला आहे.
निलंबनाची कुºहाड
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील गडहिंग्लज येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असणाºया सुनील कदम याच्यावर निलंबनाची कुºहाड पुन्हा कोसळणार आहे. सलग चार वर्षे सेवेत गैरहजर राहिल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी तो पुन्हा सेवेत आला होता. भोळ्या स्वभावाच्या मामाकडून आर्थिक लाभ उकळण्यासाठी मामेभावाचे अपहरण करण्याचा डाव रचणाºया सुनील कदम याला सलग पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने त्याचे निलंबन होण्याची शक्यता आहे.