कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटक

By Admin | Published: March 8, 2017 06:36 PM2017-03-08T18:36:09+5:302017-03-08T18:36:09+5:30

म्हैसाळ भ्रूण हत्याकांड : कर्नाटक कनेक्शन उघड, दोन सोनोग्राफी मशिन जप्त

Three doctors were arrested with a doctor in the paper | कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटक

कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटक

googlenewsNext

कागवाडमधील डॉक्टरसह तिघांना अटक

म्हैसाळ भ्रूण हत्याकांड : कर्नाटक कनेक्शन उघड, दोन सोनोग्राफी मशिन जप्त

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ.
बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे याच्यासाठी महिलांची गर्भलिंग निदान
चाचणी करणाऱ्या कागवाड (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील डॉ. श्रीहरी कृष्णा
घोडके (वय ६८), डॉ. खिद्रापुरे याची सहाय्यक सौ. कांचन कुंतिनाथ रोजे
(३५, रा. शेडबाळ, ता. अथणी), उमेश जोतिराम साळुंखे (२८, नरवाड) यांना
मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. डॉ. घोडके याच्या रुग्णालयातून दोन
सोनोग्राफी मशिन पोलिसांनी जप्त केली. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवस
पोलिस कोठडी दिली आहे.
मणेराजूरी येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याने
अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळमध्ये डॉ.
खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण सापडले होते. त्याला
मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या डॉ. खिद्रापुरे
याने कर्नाटकातील कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके याच्याकडून गर्भलिंग
चाचणी करून म्हैसाळ येथील आपल्या रूग्णालयात गर्भपात करीत असल्याची कबुली
दिली आहे. पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री कागवाड येथे डॉ. घोडके याच्या
रुग्णालयावर छापा टाकून तेथील दोन सोनोग्राफी मशिन, रुग्णांच्या नोंदी
असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली. डॉ. घोडके व त्याचा सहाय्यक उमेश
साळुंखे यांचा गुन्ह्यात सहभाग अढळल्याने त्यांना मंगळवारी रात्री उशिरा
अटक करण्यात आली आहे. डॉ. खिद्रापुरेला गर्भपातासाठी मदत करणाऱ्या सौ.
कांचन रोजे या परिचारिकेसही पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने डॉ. घोडकेसह
तिघांनाही दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
डॉ. खिद्रापुरे याच्या भ्रूणहत्या रॅकेटचे कर्नाटकातील कनेक्शन उघडकीस
आले असून अथणी व जमखंडी येथील आणखी काही डॉक्टरांकडे गर्भलिंग निदान
चाचणी करण्यात येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यात
सहभागी असलेल्या सांगली, मिरजेतील अन्य काही डॉक्टरांनाही चौकशीसाठी
पाचारण करण्यात येणार आहे. डॉ. खिद्रापुरे याच्या रूग्णालयातील कागदपत्रे
व संगणकावरील नोंदीवरून पोलिसांनी गर्भपाताच्या गुन्ह्याात मदत
करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. त्याला स्त्रीभ्रूण हत्येसाठी डॉक्टर
पत्नीने मदत केल्याचा संशय असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी
सांगितले. डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण
मुलींचे असल्याचा संशय असून डीएनए तपासणीच्या अहवालाची पोलिसांकडून
प्रतीक्षा सुरू आहे.


डॉ. घोडकेकडून गर्भलिंग तपासणी
गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉ. श्रीहरी घोडके यास अटक झाल्याने डॉ.
खिद्रापुरे यास मदत करणाऱ्या वैद्यक तज्ज्ञांत खळबळ उडाली आहे. डॉ. घोडके
भूलतज्ञ असून तो कागवाडमध्ये गेली ४० वर्षे रुग्णालय चालवत आहे. गेल्या
पाच वर्षापासून त्याने रूग्णांवर उपचार बंद करून सोनोग्राफी मशिनव्दारे
गर्भलिंग तपासणी सुरू केली होती. कागवाडमध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या
डॉ. घोडके याच्यावर चार वर्षापूर्वी छापा टाकण्यात आला होता. मात्र
प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याच्या अटकेमुळे मिरजेत
पोलीस ठाण्याच्या आवारात कागवाडमधील राजकीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली
होती.

Web Title: Three doctors were arrested with a doctor in the paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.