काय सांगता? विहिरीचा घेर केवळ तीन फूट!, सांगलीतील शिराळ्यात चर्चेचा विषय
By श्रीनिवास नागे | Published: January 20, 2023 03:52 PM2023-01-20T15:52:04+5:302023-01-20T15:52:31+5:30
विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली
शिराळा (जि. सांगली) : उपवळे कदमवाडी (ता. शिराळा) येथे तीन फूट घेराच्या विहिरीचे सुरू असलेले काम तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. विहिरीचे खोदकाम दोघेच मजूर करीत आहेत, हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
मारुती ऊर्फ भिकू सावंत यांच्या शेतात या विहिरीचे काम सुरू आहे. संपत जगन्नाथ चव्हाण (५३), बाळासाहेब जगन्नाथ भोसले (५५, दोघे रा. राजापूर ता. तासगाव) विहिरीचे काम करीत आहेत. तिचा घेर तीन फूट असून आठ फूट लांबीचा पाइप घालून ही विहीर खोदाई सुरू केली आहे. या पाइपमधून एकजण खाली उतरून ब्रेकरच्या साहाय्याने खोदाई करून निघालेली माती, दगड बादलीच्या साहाय्याने वर ओढून घेत आहे.
जवळपास तीस फूट खोल ही विहीर गेली आहे. आत उतरल्यावर खोदाई करणाऱ्यास ऑक्सिजन मिळतो की नाही, हेही पाहिले जाते. या दोघांनी सांगली, सातारा जिल्ह्यात अशा ५०० विहिरी खोदल्या आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी करगणी (आटपाडी) येथील व्यक्तीला अशी विहीर खोदताना पाहिले आणि स्वतःच्या शेतात त्यांनी ही पहिली विहीर खोदली. त्यावेळी ब्रेकर नव्हता. आठ दिवसात ३५ फूट खोल विहीर काढली. आतापर्यंत सर्वात जास्त ८० फूट खोलीची विहीर २५ दिवसात खोदली आहे. बोरगाव (रहिमतपूर) येथे ३५ फूट खोल, वर तीन फूट व खाली २५ फूट घेरा असणारी विहीर खोदली आहे.
पूर्वी खोदाईसाठी ब्रेकर नव्हते. त्यावेळी कुदळीच्या साहाय्याने खोदाई केली जात होती. वेळ जास्त लागत होता. तीन फूट घेर व खाली चौदा पंधरा फूट गेल्यावर २५ फूट घेराच्या विहिरीची खोदाई कौशल्यपूर्ण ठरते. - संपत चव्हाण, बाळासाहेब भोसले, खोदाई कामगार