सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास

By admin | Published: October 2, 2016 01:12 AM2016-10-02T01:12:25+5:302016-10-02T01:12:25+5:30

पेरणीचा वाद : चाकू, काठ्या, गजाने हल्ला

Three glass lamps of Sangli car break | सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास

सांगलीत मोटारीची काच फोडून तीन लाख लंपास

Next

सांगली : येथील जुना बुधगाव रस्त्यावरील वखार भागामध्ये मोटारीची काच फोडून चोरट्यांनी आतील तीन लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कारंडेवाडी (ता. सांगोला) येथील रामा दरीबा नरळे (वय ४८) यांनी घटनेची शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात तातडीने नाकाबंदी केली होती.
रामा नरळे यांचा ट्रक वाहतुकीचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी स्वत:चा ट्रक (क्र. एमएच १० एक्यू ३६०७) रंगकामासाठी वखार भागातील गॅरेजमध्ये सोडला होता.या कामाची मजुरी तीन लाख रुपये झाली होती. ती देण्यासाठी ते शनिवारी मोटारीने (एमएच ४५ एन ५४०७) सांगलीत आले होते. आझाद चौकातील अ‍ॅक्सीस बँकेतून त्यांनी तीन लाखांची रोकड काढली. ही रोकड त्यांनी बॅगेत ठेवली. बॅग मोटारीत चालकाच्या बाजूच्या आसनावर ठेवून ते दुपारी एक वाजता वखार भागात गेले. तेथील भोजलिंग ट्रान्स्पोर्टजवळ त्यांनी मोटार लावली. ट्रकचे रंगकाम पाहण्यासाठी ते गॅरेजकडे चालत गेले. जाताना त्यांनी रोकड असलेली बॅग मोटारीतच ठेवली. रंगकाम करणाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. ट्रकचे संपूर्ण काम झाल्याने मजुरी देण्यासाठी रक्कम घ्यावी म्हणून ते पुन्हा मोटारीकडे आले. त्यावेळी त्यांना मोटारीची चालकाच्या बाजूची काच फोडल्याचे लक्षात आले. मोटारीत काचांचा खच पडला होता. रोकड असलेली बॅग नव्हती. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. गॅरेज व्यावसायिकांनी तेथे गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहरात तातडीने नाकाबंदी करण्यात आली. कॉलेज कॉर्नर, कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौक, जुना बुधगाव रस्ता, माधवनगर, बायपास रस्ता, पुष्पराज चौक, टिळक चौक, राजवाडा चौक येथे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली. हेल्मेट घालून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली. सायंकाळपर्यंत नाकाबंदी सुरू होती, पण चोरट्यांचा सुगावा लागला नाही. रात्री उशिरा नरळे यांची फिर्याद घेऊन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
पाळत ठेवून चोरी
आझाद चौकातील अ‍ॅक्सीस बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना लुटल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. रामा नरळे बँकेत गेल्यापासून चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली असण्याची शक्यता आहे. त्यांनी रोकड काढल्याचे पाहिल्यानंतर चोरट्यांनी वखार भागापर्यंत पाठलाग केला. ते मोटारीत बॅग ठेवून गेल्याचे पाहून चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांतच मोटारीची काच फोडून रोकड लंपास केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बॅगेत रोकडशिवाय नरळे यांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक व धनादेश पुस्तक होते.
 

Web Title: Three glass lamps of Sangli car break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.