तीन ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला
By admin | Published: July 22, 2016 11:57 PM2016-07-22T23:57:26+5:302016-07-23T00:05:49+5:30
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, मांडवे खुर्द ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी, मांडवे खुर्द ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतींतील १५३ जागांसाठी पोट निवडणुका होत असून, येत्या २४ आॅगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे़ निवडणुका असलेल्या गावांत गुरुवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़
राज्य निवडणूक आयोगाने येत्या सप्टेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत़ त्यानुसार नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा, तर संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी व मांडवे खुर्द ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ तसेच जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतीतील १५३ सदस्यांची पदे विविध कारणांमुळे रद्द झाली आहेत़ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत़ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास ३ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहेत़
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १० आॅगस्ट आहे़ अर्ज माघारी घेण्यासाठी अंतिम मुदत १२ आॅगस्ट असून, मतदान २४ आॅगस्ट रोजी होणार असून, मतमोजणी २६ आॅगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे़ राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या पिंपळगाव पिसा गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे़
निवडणूक पुढील आॅगस्ट महिन्यात होणार असली तरी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात होणार आहे़ त्यामुळे या गावातील राजकारणही चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत़ याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी व मांडवे खुर्दचीही निवडणूक होत असून, या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे आहेत़ पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्याही मोठी आहे़ एक व दोन जागांसाठीही का होईना, पण पोटनिवडणूक होणार आहे़ त्यामुळे पोट निवडणुका असलेल्या गावांत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे़
(प्रतिनिधी)