सांगलीत चोरट्यांनी फोडली तीन घरं, तीन लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 10:20 PM2017-11-25T22:20:08+5:302017-11-25T22:20:36+5:30

सांगलीत शुक्रवारी भरदिवसा व रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली, तर दोघांना चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली.

Three houses of Sangli thieves, three lakhs lumpas | सांगलीत चोरट्यांनी फोडली तीन घरं, तीन लाखांचा ऐवज लंपास

सांगलीत चोरट्यांनी फोडली तीन घरं, तीन लाखांचा ऐवज लंपास

Next

सांगली- सांगलीत शुक्रवारी भरदिवसा व रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडली, तर दोघांना चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड, असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
माधवनगर रस्त्यावरील घन:श्यामनगर येथील मधुकर दिगंबर निजामपूरकर २४ नोव्हेंबरला कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी भरदिवसा त्याच्या घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा उचकटून प्रवेश केला. बेडरुममधील कपाट उघडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने, तीस हजार रुपये किंमतीचा कॅमेरा लंपास केला. त्याचदिवशी रात्री साडेअकराला हे कुटुंब देवदर्शनाहून आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी संजयनगर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. शनिवारी सकाळी निजामपूरकर यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. 

माधवनगर रस्त्यावरील मीरा हाऊसिंग सोसायटीत अजित सुभाष कुलकर्णी यांचा फ्लॅटही चोरट्यांनी शुक्रवारी भरदिवसा फोडला. कुलकर्णी कुटुंब सकाळी नऊ वाजता परगावी गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्याची तीन ग्रॅमची साखळी, कॅमेरा, साडेपाच हजाराची रोकड असा ४६ हजारांचा माल लंपास केला. शिवशक्ती व्यायाम मंडळाजवळील नितीन रवींद्र शेवडे यांचा ‘अभिजित ओव्हरसिअर्स’ बंगला आहे. त्याच्या मित्राच्या मुलाचा मध्य प्रदेशमधील इंदौर येथे विवाह असल्याने शेवडे १९ नोव्हेंबरला कुटुंबासह गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचा गज कापून प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटातील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सोन्याचे २८ ग्रॅमचे मंगळसूत्र व दीड तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या असा एक लाख १८ हजाराचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी रात्री शेवडे कुटुंब घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. 
अनिकेत कोथळे प्रकरणामुळे पोलिसांच्या अब्रूचे संपूर्ण राज्यात धिंडवडे उडाले आहेत. पोलिसांकडे पाहण्याचा द्दष्टिकोन बदलला आहे. अजूनही जिल्ह्यात कोथळे प्रकरण आणि पोलिस असे वागू शकतात का? याची चर्चा रंगली आहे. तत्पूर्वी गेल्या सहा महिन्यात वाढलेल्या गुन्हेगारीचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. शहर उपविभागीय क्षेत्रात ‘अर्धा’ डझनहून अधिक खून झाले. खुनीहल्ला, मारामारी या घटना नित्याच्याच बनल्या आहेत. घरफोडी दररोज कुठे-ना-कुठे होत आहेत. महिला प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने लंपास केले जात आहेत. पोलीस असूनही काही उपयोग नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

चाकूच्या धाकाने प्राध्यापकाला लुटले
कलानगरमधील शहाजी धोंडीराम गडदे हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते दररोज रेल्वेने जातात. शुक्रवारी सायंकाळी ते साडेसहा वाजता कोल्हापूर-पुणे पॅसेंजरने सांगलीत स्थानकावर उतरले. रुळावरुन ते चालत शिंदे मळ्यातील पुलावरुन येत होते. त्यावेळी १४ वयोगटातील तीन मुलांनी चाकूचा धाक दाखवून गडदे यांच्याकडून पाचशे रुपयांची रोकड, मोबाईल, पॅनकार्ड, एटीएमकार्ड व धनादेशबुक लंपास केले. 

बहीण-भावास लुटले
वखार भागातील लोणी गल्लीत सतीश नारायण कलाल राहतात. ते रिक्षा चालवितात. शुक्रवारी मध्यरात्री ते बहीण व भाच्याला रिक्षातून घेऊन रेल्वे स्टेशनजवळ राहत असलेल्या भावाकडे निघाले होते. गोकुळनगरजवळ गेल्यानंतर पाठीमागून दोन दुचाकीवरुन चार चोरटे आले. त्यांनी दुचाकी आडवी मारुन रिक्षा थांबविली. चाकूचा धाक दाखवून कलाल यांच्याकडील साडेचार हजाराची रोकड, त्यांच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले लंपास केली. 

पोलीस कोठे आहेत?
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आठवड्यात तर दररोज कुठे-ना-कुठे तर चोरी होत आहे. घरासमोर लावलेल्या दुचाकी रात्री लंपास केल्या जात आहेत. भरदिवसा फ्लॅट फोडले जात आहेत. चाकूच्या धाकाने खुलेआम लुटले जात आहे. लुटमारीतून एक खून झाला. त्यामुळे सांगलीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने या घटना घडत असताना पोलिस मात्र रस्त्यावर कोठेच दिसत नाहीत. आतापर्यंत झालेल्या एकाही चोरीचा छडा लावता आलेला नाही.

Web Title: Three houses of Sangli thieves, three lakhs lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.