‘ॲनिमल सहारा’कडून दररोज तीनशेवर प्राण्यांच्या अन्नाची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:16+5:302021-05-27T04:28:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊनमुळे शहरातील मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. या मुक्या प्राण्यांना अन्न पुरविण्यासाठी प्राणीमित्र आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊनमुळे शहरातील मुक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. या मुक्या प्राण्यांना अन्न पुरविण्यासाठी प्राणीमित्र आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. दररोज सुमारे अडीचशे ते तीनशे कुत्री-मांजरे, भटक्या गाई, म्हैशी, घोडे, गाढवांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यंदाच्या लॉकाडाऊनमध्ये मुक्या प्राण्यांची अन्न-पाण्याविना उपासमार सुरू होती. मोकाट कुत्री हिंस्त्र झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. यासाठी ॲनिमल सहारा फौंडेशनचे अध्यक्ष अजित काशीद यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील भटक्या प्राण्यांसाठी पदरमोड करून खाद्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे हे काम पाहून पद्माळे (ता. मिरज) येथील सरपंच सचिन जगदाळे, कोरोना रुग्ण सहायक समितीचे सतीश साखळकर, प्रशांत भोसले, प्रदीप कांबळे, शशिकांत जगदाळे, शरद पाटील, दिलीप कदम, रमेश जगदाळे, मच्छिंद्र भोसले यांनीही पुढाकार घेतला. अन्नाची व्यवस्था काशीद यांना उपलब्ध करून दिली.
फौंडेशनच्या टीमची प्रभागनिहाय भटकंती सुरू असून, दररोज तीनशेहून अधिक मोकाट प्राण्यांना घास भरविला जात आहे. ॲनिमल सहाराच्या पुष्पा काशीद, सिद्धार्थ कांबळे, गणेश रजपूत, राहुल पाटील, संदीप माळी, चंदू माळी यांचा यात सहभाग आहे.