सांगली जिल्ह्यातील तीनशेवर सहकारी संस्था अवसायनात निघणार
By अविनाश कोळी | Published: October 18, 2023 01:59 PM2023-10-18T13:59:38+5:302023-10-18T13:59:53+5:30
सर्वेक्षण पूर्ण : कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्थांना दणका
सांगली : कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या व नोंदणीकृत पत्त्यावरुन गायब असलेल्या सहकारी संस्थांचे खाते आता कायमचे बंद होणार आहे. जिल्ह्यात आठशेहून अधिक संस्थांच्या सर्वेक्षणात २२८ संस्था बंद अवस्थेत व ७५ सहकारी संस्था पत्त्यावर आढळून न आल्याने त्या अवसायनात काढण्याची तयारी सहकार विभागाने सुरु केली आहे.
बिनकामाच्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून उर्वरित संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याच्यादृष्टीने ही मोहीम सहकार विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या आहेत.
४३५९ सहकारी संस्था जिल्ह्यात
सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या ४ हजार ३५९ इतकी आहे. कृषी बँका, कृषी पतसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणन संस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, दूध संस्था, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन संस्था, ग्राहक भांडारे, गृहनिर्माण संस्था, कामगार कंत्राटदार संस्था अशा अनेक प्रकारच्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत.