मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:25 AM2021-03-26T04:25:45+5:302021-03-26T04:25:45+5:30
संजयनगर : सांगली शहरातील चिंतामणनगर परिसरात दोन बालकांसह तिघांना मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. या परिसरात सुमारे ८० ...
संजयनगर : सांगली शहरातील चिंतामणनगर परिसरात दोन बालकांसह तिघांना मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. या परिसरात सुमारे ८० ते ९० मोकाट कुत्री आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. कुत्र्याच्या चाव्याने सावित्री वायदंडे (वय ३) अमर सदाकळे (४५) यांच्यासह बालक जखमी झाले आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कुत्री पकडण्याची मोहीम सध्या बंद आहे. सांगलीसाठी एक; तर मिरज-कुपवाडसाठी एक अशा डॉग व्हॅन आहेत. तरीही या भागात कधीही कुत्री पकडली जात नाहीत. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकांनी उपाययोजना सुरू करूनही मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. संजयनगर, अभयनगर, चिंतामणीनगर, संपत चौक, शिंदे मळा, अहिल्यादेवी होळकर चौक, साठेनगर, चैतन्यनगर, जगदाळे प्लॉट, डॉक्टर लिमे रोड, होळकर चौक, अण्णा चौक, रेडेकर प्लॉट, जगदाळे प्लॉट, अभिनंदन कॉलनी, साईनगर, हडको कॉलनी, आदी भागांत मोकाट कुत्र्यांचा त्रास सुरू आहे. रात्रीच्या वेळी वाहनांच्या दिशेने कुत्री धावत असतात. यामुळे गाडीखाली कुत्री येऊन अनेक वेळा अपघात झाले आहेत. यात काही नागरिक जखमी झाले आहेत.